पालखी सोहळा सुरळीत पार पाडा ; वारकर्‍यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 2 ते 5 जुलै दरम्यान जिल्ह्यातून मार्गक्रमण होणार आहे. या काळात वारकर्‍यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 2 ते 5 जुलै दरम्यान जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी येत असतात. आपल्याला त्यांच्या सेवेची संधी मिळत आहे. पालखी सोळ्यादरम्यानचे सर्व नियोजन प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी करावे. पालखी सोहळ्या दरम्यान वारकर्‍यांची मोठी गर्दी होणार आहे. गर्दीमुळे मोबाईलच्या रेंजवर परिणाम होईल यासाठी महत्वाच्या अधिकार्‍यांना वॉकीटॉकी देण्यात यावे म्हणजे योग्य नियोजन करता येईल. तसेच वारकर्‍यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी मागेल त्याला विद्युत वितरण कंपनी कडून अधिकृत विज जोडणी देण्यात येणार आहे, याबाबत विद्युत वितरण कंपनीने जनजागृती करावी.
पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबते त्या ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणत येतात. या ठिकाणी गोंधळ अथवा चेंगराचेंगणी होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. पालखी सोहळ्या दरम्यान आरोग्य विभागाने 19 रुग्णवाहिका व 21 पथक तैनात करण्यात येणार आहे, त्यांच्याकडे मुबलक असा औषधसाठा देण्यात यावा. वारकर्‍यांना पिण्यासाठी पुरविण्यात येणार्‍या पाण्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिवसातून दोन वेळा नमुने तपासले जाणार आहेत. वारकर्‍यांच्या स्वयपाकासाठी 12 हजार लिटरचे दोन किरोसीनचे टँकर देण्यात येणार आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यासाठी 3 पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेने वारकर्‍यांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.