सातारची सुकन्या शिवानी बनली मिस इंडिया

भुईंज : सातारा जिल्ह्याची सुकन्या शिवानी जाधव या वर्षाची मिस इंडिया बनली असून याबद्दल तिच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुळ गाव मर्ढे ता. सातारा येथील शिवानी जीवन जाधव हिने मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनल हा किताब मिळवून सातारा जिल्ह्याची एक नवी ओळख निर्माण केली. ती छत्तीसगड या राज्याच्यावतीने आयोजित स्पर्धेत सहभागी झाली होती. तिच्या निवडीची बातमी भुईंज येथे समजताच भुईंज येथेही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रित्यर्थ तिच्या आजोळचे नातेवाईक प्रकाश पवार, राहुल पवार, रोहित पवार, चाचा पवार यांनी गावात मिठाई वाटली. लवकरच तिचा भुईंज येथे विविध संस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या शैला पिसाळ, प्रेस क्लबचे राहुल तांबोळी यांनी दिली.