संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन

सातारा : संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज दुपारी 2 च्या सुमारास टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणार्‍या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्रांतांधिकारी संगीता चौगुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आदींसह विविध पदाधिकारी, मान्यवर व वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानानंतर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते. विविध विभागांच्या सामाजिक संदेश देणारे फलक विशेष लक्ष वेधून घेत होते.
प्रशासनाने पुरविल्या वारकर्‍यांना विविध सुविधा
आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पाडेगांवमध्ये आगमन झाले. या पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकर्‍यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून रॉकेल, गॅस, स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारकर्‍यांसाठी 1800 मोबाईल टॉयलेट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
नीरा नदीच्या तीरावर पाडेगाव येथे पालखी स्वागताच्या ठिकाणी पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम सातारा जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यामध्ये शौचालयाचा वापर, गाव व परिसर स्वच्छ ठेवणे, गावातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याची कला पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. हे कला पथक पाहण्यासाठी वारकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती.