सातारा जिल्ह्यात बेंदूर सण आनंदाने साजरा

सातारा – बैलांचा वर्षातील एकमेव बेंदूर सण असल्याने सातारा शहरात व परिसरात आज दुपारी पावसाने उघडीप दिल्याने बैलांना सजवून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
फलटण तालुक्यात सर्जा-राजांचा बेंदूर सण साजरा
फलटण – शेतात राबणार्‍या बैलांचा वर्षातील एकमेव बेंदूर हा सण शनिवारी फलटण तालुक्यात अनेक भागात साजरा करण्यात आला. सध्या पावसाने ताण दिल्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाने आपल्या लाडक्या सर्जा-राजांचा हा सण मात्र आनंदाने साजरा करून मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील बैले छावणीत असल्याने यावर्षी बेंदूर हा छावणीत साजरा करावा लागल्याने सनादिवशी शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर निराशा दिसून येत होती.
शेतकर्‍यांनी सकाळीच बैलांना अंघोळ घातली. त्यानंतर दुपारी बेगड, झूल, रंग, शेम्ब्या, बाशिंग, फुगे, हिंगूळ आदी साहित्याने बैलांना सजवण्यात आले. सायंकाळी विविध गावातून तसेच फलटण शहरातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशा, बँड आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ही मिरवणूक लक्षवेधी झाली. ग्रामप्रदक्षिणेनंतर सुवासीनींनी बैलांना ओवाळून पुरणपोळीचा घास भरवला. फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचे पेमेंट न दिल्याने आधीच अडचणीत असणारा बळीराजा अजुन अडचणीत गेल्याने तालुक्यात साखर कारखानदारांवर शेतकर्‍यांचा नाराजीचा सुर आहे. दुष्काळी परिस्थिती व ऊसाचे पेमेंट न झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. येणार्‍या काळात भरपूर पाऊस पडो आणि बळीराज्याचे राज्य येवो अशी मागणी शेतकरी राजा परमेश्वराकडे या सणाच्या निमित्ताने करत होता.
वाई मध्ये बेंदूर पारंपारीक वाद्याच्या गजरात साजरा
वाई : आपल्या संस्कृतीत बेंदूर सणाचे मोठे महत्व आहे. बैल म्हणजे श्रम म्हणजेच कष्ट….. अशा कष्ट करणार्‍याची पुजा म्हणजेच जो दुसर्‍यासाठी श्रम घेतो अशा श्रम देवतेची पुजा करण्याचा हा दिवस…. बैलांचे शेतकर्‍यांवरती अनंत उपकार असतात व तो ते उपकार फेडू ही शकत नाही. म्हणून ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर हा सण आत्मीयतेने बळीराजा साजरा करतो. वास्तविक पाहता कष्ट करणार्‍या बैलांचा सन्मानार्थ बेंदूर सणानिमित्त त्याची भक्ती भावाने स्नान घालून विधिवत पुजा करून विविध प्रकारच्या रंगाने व सजावटीच्या साहित्य वापरून सजविले जातात. व गावातून त्यांची सवाद्य देवदर्शनासाठी भक्ती भावाने मिरवणूक काढतात ही खरी प्रथ ाआहे. वास्तविक पाहता बदलत्या यांत्रिकीरणाच्या काळात बैलांची संख्या सर्वत्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. वाई शहरासह ग्रामीण भागात बैलांच्या मिरवणूकीत बैल कमी व पारंपारीक वाद्याच्या तालावर नाचणारे सैराट कार्यकर्ते जास्त असे विदारक चित्र पहावयास मिळत होते.वाईच्या किसनवीर चौकात वाडीवस्तीवरून आलेल्या बैलांना पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती तसेच वाईच्या मुख्य चौाकामध्ये फुगे, खेळणी, खाद्य पदार्थ, व इतर विके्रत्यांच्या दुकांनानमुळेे चौकाला यात्रेचे स्वरूप आले होते. वाई शहरात पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
औंध परिसरात बेंदूर सणानिमित्त बैलांची मिरवणूक
औंध : मागील दोन वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या औंधसह खटाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील 15 गावांमध्ये बेंदराचा सण बळीराजाने आपल्या लाडक्या सर्जा राजाला गोडधोड खायला घालून, वेगवेगळ्या रंगांनी रंगवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तर गोपुज येथे सुमारे पस्तीस ट्रॅक्टर सजवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
कायम दुष्काळाच्या झळा सोसणार्या औंध भागातील नांदोशी, त्रिमली, खबालवाडी, लांडेवाडी, करांडेवाडी, गणेशवाडी, करांडेवाडी, जायगाव, कळंबी, अंभेरी, कोकराळे, पळशी, खरशिंगे, गोसाव्याची वाडी, वरुड, भोसरे व अन्य गावांमध्ये यंदा पावसामुळे खरीप पिकांच्या पेरण्या ही वेळेवर झाल्या असून हा उत्साह सोमवारच्या महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त सर्वत्र दिसून येत होता.
सकाळपासून बळीराजा आपली पाळीव जनावरे बैल, गाय, म्हैशी व अन्य पाळीव जनावरांना पाण्याने स्वच्छ धुऊन, वेगवेगळ्या रंगांनी रंगवून सजविण्यामध्ये दंग होता. त्यानंतर बेगड,झुली टाकून सर्जा राजाला ओवाळून गोडधोड, पुरणपोळी खायला घालून गावोगावी वाडया वस्त्यांवर वादयव्रूंदाच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करून, गुलाल उधळून मिरवणूका काढण्यात आल्या. दरम्यान औंध येथे ही शेतकर्‍यांनी एकत्रितपणे ग्रामपंचायत चौक,बालविकास मंदिर, हायस्कूल चौक, होळीचा टेक, मारुती मंदिर मार्गे मिरवणूक काढली. यामध्ये कुंभारवाडा,माने वस्ती, गोटेवाडी, केदार चौक, जुने एसटी स्टँड, देशमुख गल्ली व अन्य भागातील शेतकर्‍यांनी यामध्ये सहभाग घेतला.