पाचगणीत धुवाधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

पांचगणी : पांचगणी शहर आनी परिसरात गेल्या चार दिवसापासून धुवाधार पाऊस कोसळत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने पर्यटकांनी पावसाळी पर्यटनासाठी पांचगणी व महाबळेश्वरात तोबा गर्दी केली आहे.
गेले चार दिवसांपासून पांचगणीत पावसाने मुसळधारपणे हजेरी लावली आहे. या पावसाने नद्या नाले दुथडी भरून वाहात आहेत. तर छोटे मोठे धबधबे ओसंडून वाहू लागल्याने निसर्गाचा देखावा पाहण्यासाठी व धबधबे आणि पावसात चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहिली आहे तर पर्यटकांच्या गाड्यांनी बर्‍याचं ठिकानी वाहतूक कोंडी केली आहे.
मुसळधार पाऊस आणि जोराच्या वार्‍याने बर्‍याच ठिकाणी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मुसळधार पाऊस व जोरदार वाहणार्‍या वार्‍यामुळे शहराच्या विविध भागात झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे विजेचा खेळखंडोबा झाला आहे. त्याच बरोबर रस्ते वहातुकिवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळी मालाज हॉटेल जवळील सिल्वर ओकचे झाड कोसळले तर बेबी पॉईंटजवळ सिल्वरचे झाड विजेच्या तारांवर पडल्याने वीज वितरनचे तारा तुटल्या आहेत. तसेच दांडेघर येथे हॉटेल जॉस्टॅन जवळील सिल्वरची ओकची भली मोठी फांदी विजेच्या ट्रान्सफॉर्मर वर पडल्याने वीजमीटरचे नुकसान झाले आहे. तसेच पॉवर हाऊस व संजीवन नाका या ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शहरातील विजेचा खेळखंडोबा झाला आहे. जोरदार पाऊस व वार्‍यामुळे वारवार वीजपुरवठा खंडित होत आहे.
सकाळी वीज वाहक तारांवर पडलेल्या झाडांमुळे खंडित झालेल्या वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वीज वितरण कंपनी च्या कर्मचार्‍यांनी तात्काळ करीत वीजपुरवठा सुरू केला आहे.
पावसामुळे पांचगणी, भिलार, करहर, परिसरात मुसळधार पडत असून डोंगरदर्‍यातील ओढ्या नाल्याना पाणी आले आहे. ते भिलार वॉटर फॉल फेसाळला आहे. वातावरणातही गारठा चांगलाच वाढला आहे. या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.