लोकपाल कायद्याला अधु करण्याचे पाप पंतप्रधानांनी केले ; आण्णा हजारे यांचा आरोप ; 23 मार्चपासून दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन 

कोरेगाव : प्रगत राष्ट्रांच्या पंगतीत बसत असताना देशभरातील लोकांसाठी अत्यंत गरजेचे असलेला लोकपाल कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर जरुर केला, मात्र त्याला अधु बनविण्याचे पाप देखील केले. तीन दिवसात विधेयक मंजूर केले असून, हे विधेयक कधी आले आणि कधी मंजूर झाले, याचा थांगपत्ताच लागला नाही, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केला.
लोकपाल कायद्यासह नव्याने स्थापन केलेल्या भारतीय जनसंसद संघटनेच्या प्रसारासाठी देशव्यापी दौरा सुरु केला असून, सातारा जिल्ह्यातील पहिलीच सभा शुक्रवारी कोरेगावातील बाजार मैदानावर झाली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनसंसद संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक सब्बन, तालुकाध्यक्ष संजय माने, अ‍ॅड. अमोल भुतकर, सुरेश येवले, अनिल बोधे, प्रशांत गुरव, रमेश माने, शिवाजीराव गाढवे,  चंद्रकांत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माहिती अधिकाराच्या कायद्याप्रमाणेच लोकपाल कायदा हा देशातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा कायदा व्हावा, यासाठी आमचा लढा होता व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत लोकपाल कायदा करणार अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर लोकांनी त्यांना एकहाती सत्ता सोपविली, मात्र त्यांनी लोकांच्या विश्‍वासाला तडा देत लोकपाल कायदा बनविला, मात्र त्याला अधूच केले. तीन दिवसांमध्ये हा कायदा संमत होतो आणि त्याची कोणालाच माहिती होत नाही, याहून मोठे दुर्देव नाही, अशी टीका हजारे यांनी केली.
प्रशासनामध्ये आणि सरकारमध्ये पूर्ण पारदर्शकता असावी या हेतुने लोकपाल कायदा होऊन, त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे होते. तसा मसुदा तयार करुन आम्ही सरकारला दिला होता, मात्र आमच्या मसुद्याला बगल देत नवीन कायदा झालेला असून, तो आम्हाला मान्य नाही. आम्ही दिलेल्या मसुद्याप्रमाणे कायदा करावा, या मागणीसाठी नवी दिल्लीत दि. 23 मार्चपासून आंदोलन छेडणार आहे, असा इशारा हजारे यांनी दिला. आजवर देशात लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, मात्र एकाही उद्योगपतीने आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
हजारे पुढे म्हणाले की, आजवर आमच्या संघटनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला आहे. पूर्वीचा अनुभव अत्यंत वाईट आहे. प्रतिज्ञापत्र नसल्याने आमच्या संघटनेच्या आधारावर लोकांमध्ये स्थान मिळवून एक मुख्यमंत्री, एक नायब राज्यपाल व केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळवण्याचे काम काही कार्यकर्त्यांनी केले आहे. आता असे चालणार नाही. भ्रष्ट्राचार विरोधी संघटना  बरखास्त केलेली असून, नव्याने भारतीय जनसंसद संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे सभासद होण्यासाठी कार्यकर्त्याला शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र करुन बंधनकारक आहे. कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही आणि मी स्वत: पारदर्शक व निष्कलंक असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करुन द्यावे लागणार आहे. आजवर या संघटनेचे चार हजार सभासद बनले असून, त्यांनी प्रतिज्ञापत्र करुन दिले आहे. दोन लाख सभासद बनविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. देशात कोणाचीही सत्ता असो अथवा कोणीही पंतप्रधानपदावर असो, त्याचे नाक, तोंड उघडण्याची धमक आमच्यामध्ये दोन लाख सभासदांमुळे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय माने व सुरेश येवले यांनी आण्णा हजारे यांचा सत्कार केला. अशोक सब्बन, अ‍ॅड. अमोल भुतकर, अनिल बोधे व चंद्रकांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रशांत गुरव यांनी आभार मानले.