सोलो तबल्याचा नाद…. कथ्थकची बहारदार अदाकारी पहाटवार्‍यात बहरला औंधचा संगीत महोत्सव

औंध : मोठ्या दिमाखात व शास्त्रीय गायनाच्या सुरेल मैफिलीने गुरुवारी सुरू झालेला औंध संगीत महोत्सव गुरुवारी सायंकाळी शितल वारा व चांदण्या रात्रीच्या साक्षीने अधिकाधिक बहरत गेला. नव्या दमाच्या नृत्यांगणा अमृता गोगटे  यांच्या कथ्थक नृत्याने हजारो रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला तर सत्यजित तळवलकर यांच्या जादुई तबला सोलोने अवघे औंध कलामंदिर जणू त्यांच्या बोटांवर थिरकल्याचा भास त्याठिकाणी निर्माण झाला. यावेळी प्रचंड टाळयांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला.
येथील शिवानंद स्वामी संगीत महोत्सवात दुसर्‍या सत्राचा ताबा शास्त्रीय संगीतील दर्जेदार नाव असलेल्या व पं गजानन बुवा जोशी यांची शिष्या शुभदा पराडकर यांनी घेतला. सायंकाळी मावळतीला जाणार्या सुर्याच्या तेजस्वी किरणाप्रमाणे राग धनश्री व राग श्री सादर केला. यानंतर आग्रा घराण्याचे गायक व अनेक घराण्याच्या गायकीवर प्रभूत्व असलेले जेष्ठ गायक बबनराव हळदनकर यांचे गायन झाले. त्यांनी सादर केलेला राग शामकल्याण त्यांचे शिष्यगण कानात रस घेऊन ऐकत होते. यानंतर सायंकाळी सात वाजता मरियाझ स्मरणिकेचे प्रकाशन पुणे येथील ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ प्रवीण भोळे अरूण कशाळकर सुचेता बिडकर सरपंच रोहिणी थोरात उपसरपंच बापूसाहेब कुंभार सुनिल पवार दत्तात्रय जगदाळे प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ भोळे म्हणाले कि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने मनोरंजनाची व्याख्या देखील बदलली आहे. संगीत आता मुठीत आले आहे. व्याप्ती बदलत असताना औंध सारख्या ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताचे अधिष्ठान जपणे सोपी गोष्ट नाही. या स्वरयज्ञात ललित कला केद्रास खारीचा वाटा उचलता येतो हे मोठे भाग्य आहे.यानंतर नव्या दमाच्या तरूण नृत्यांगणा अंमृता गोगटे यांनी कथ्थक नृत्य सादर केले. चेहरयावरील भावमुद्रा सफाईदार पदलालित्य ताकदीने केलेले सादरीकरण यामुळे उपस्थीतांची मने जिंकली .त्यांनी पारंपारीक ध्रुपद शंकर गिरीजा पाते सादर केले रसिकांनी देखील त्यांना भरभरून दाद दिली.
रात्री दहा वाजता या महोत्सवाच्या तिसर्या व शेवटच्या सत्रास सुरवात झाली. विख्यात तबला वादक तालयोगी पं सुरेश तळवलकर व ख्याल गायिका पझ्मा तळवलकर यांचे सुपूत्र सत्यजीत तळवलकर यांनी प्रथमच या महोत्सवात हजेरी लावत रसिकांना मंत्रंमुग्ध केले सोलो तबला वादन करताना त्रिताल वाजवला तबल्यांवर सफाईदार फिरणारी बोटे व नेटके सादरीकरण करीत मैफीलीत रंगत आणली रसिकांनी द
टाळयाचा कडकडाट करीत तरूण पिढीचा वारसदार असलेल्या सत्यजीतच्या तबला वादनाला भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर अनुपमा भागवत यांनी बिहाग व शहाणा कानडा राग सादर केला. खादीम हुसेन खॉ यांचे सुपूत्र राजामियॉ  यांनी मध्यरात्रीच्या निरव शांततेत गारा कानडा हा शाही राग पेश करीत बैठकीची उंची वाढवली.  जयपूर येथील तरूण गिटार वादक दिपक क्षीरसागर मैफीलीचा ताबा घेउन दिवसाच्या पहिल्या प्रहरी गायला जाणारा राग बसंत मुखारी स्लाईड गिटार वर वाजवला  पहाटे गजानन बुवा व बबनराव हळदनकर यांचे शिष्य अरूण कशाळकर यांचे गायन झाले भैरव आणि भैरवी हे राग त्यांनी सादर केले त्यांच्या बहारदार गायनाने पहाटेच्या बोचर्या थंडीतही रसिक मधाळ उबदार स्वरांनी न्हाऊन निघाले सर्व कलाकारांना संवादीनीवर सुयोग कुंडलकर तन्मय देवचक्के अनंत जोशी व तबल्यांवर प्रवीण करकरे सुमित नाईक दत्तात्रय भावे स्वप्नील भिसे यांनी साथ केली.

 

या शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्यासाठी पं गजानन बुवा जोशी व अंतूबुवा जोशी यांचे राज्याच्या कानाकोपर्यातील शिष्यगण व ग्रामीण भागातील रसिकांनी आवर्जून हजेरी लावत कलाकारांना भरभरून दाद दिली वारसदारांच्या गैरहजेरीतही शिष्यगणांनी संयोजनाचे शिवधनुष्य पेलत आपल्या गुरूंना स्वरसुमनांची आदरांजली वाहीली.चौकट.. औंध संगीत महोत्सवात पहिल्यांदाच  परदेशी  विद्यार्थ्यांनी हजेरी लावून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले व औंध सारख्या ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताचे जतन केले जात असल्याने समाधान व कौतुक केले.