काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर सातार्‍यातील सर्व व्यवहार सुरळीत

सातारा : कुस्तीपूर्वी मल्ल जसा दंड थोपटून ताकद आजमावतो, तशाच पद्धतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोल, डिझेल दरवाढीचे कारण सांगून काँग्रेस व राष्ट्रवादीने हायकमांडच्या आदेशाने सोमवारी भारत बंदची हाक दिली. परंतू काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर सातार्‍यातील सर्व व्यवहार सुरळीत चालू असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच त्याच दिवशी स्वातंत्र्यसैनिक नागनाथ अण्णा नायकवडींच्या जेल फोडो घटनेची पंचाहत्तरी कार्यक्रम साजरा करण्यात आला.
काल काँग्रेसचे आ. आनंदराव पाटील व राष्ट्रवादीचे सुनिल माने या दोन जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेवून सातारा बंद यशस्वी होईल, असा दावा केला होता. त्याचवेळी शासकीय विश्रामगृहात विधानपरिषदेचे सभापती रामराजे व खा. श्री. छ. उदयनराजे वेगवेगळ्या दालनात हजर होते. आज त्यांनी नेहमीप्रमाणे आपले कामकाज चालूच ठेवले. सकाळी 11 वाजता सातार्‍यातील पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजिक काँग्रेसच्या महिला नेत्या सौ. रजनी पवार व राष्ट्रवादीच्या सौ. समिंद्रा जाधव, रवींद्र झुटिंग, कुसूमताई भोसले, जयश्री पाटील, राजेंद्र लावंघरे, प्रिया नाईक, नम्रता उत्तेकर, अन्वर पाशा खान, रफिक शेख, अतुल शिंदे व राजकुमार पाटील यांनी बंद बाबत सातारकरांना आवाहन केले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात सर्व कार्यकर्ते निघून गेले.
आज सकाळपासूनच सातार्‍यातील बसस्थानक परिसरात वाहतूक सुरळीत होती. तसेच जिवनावश्यक वस्तूंसह सर्वच दुकाने, हॉटेल्स, वडाप व फेरीवाले यांची दुकाने उघडी होती. त्यामुळे खाजगी शाळांनी दिलेल्या सुट्टीचा बालचमूंनी मनमुराद आनंद घेतला. मात्र त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता पालकवर्ग करु लागला आहे. सातार्‍यात बंद म्हटल्यानंतर दगडफेक, एसटीची तोडफोड आणि रास्ता रोको हे नेहमीचेच समीकरण बनले आहे. परंतू आपल्या राजकीय महत्त्वकांक्षेपोटी काँग्रेस
-राष्ट्रवादीने पुकारलेल्या भारत बंदला सातारकरांनी झिडकारुन सर्व व्यवहार सुरळीत ठेवले, हा बंद सातार्‍यात इतिहास घडवून गेला. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी भवन व काँग्रेस भवन यांच्या शेजारील व्यवहार सुरु होते. हे बंद करण्यासाठी कोणीही कार्यकर्ता तिकडे फिरकलाही नाही. मात्र, डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंदला पाठिंबा देवून आपली भूमिका मांडली. महागाई विरोधात जेव्हा एखादी संघटना आंदोलन करते, त्यावेळी बघ्याची भूमिका घेणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीला सातारकरांनी चांगलीच चपराक मारली आहे.
हा बंद म्हणजे तुझे माझे पटेना आणि सत्तेवाचून करमेना हाच दोन्ही काँग्रेसचा अजेंडा दिसून आला आहे. याबाबत त्यांनी आता आत्मचिंतन करावे, अशी ज्वलंत प्रतिक्रिया भाजपचे नेते व कोरेगावचे सुपुत्र रमेश उबाळे व भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे यांनी दिली आहे.

सातार्‍यात बंदला संमिश्र प्रतिसाद…सातारा शहरात आज पेट्रोल वाढीच्या निषेधार्थ कॉग्रेस व संलग्न पक्षांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये, बसवाहतूक सुरू होती मात्र व्यावसायिकांनी भीतीपोटी सकाळपासून आपल्या दुकानंाची शटर अर्धवट उघडी ठेवली आणि दुपारनंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले