भाजपचे सातार्‍यात शक्ती प्रदर्शन

सातारा : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा नरेंद्र पाटील यांच्यासह भाजपच्या अठरा उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत स्वाती देशमुख यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. यासाठी भाजपने सातार्‍यातून जोरदार रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीत भाजपच्या कोअर कमिटीचे दिपक पवार, दत्ताजी थोरात, विठ्ठल बलशेटवार, विजय काटवटे, सुवर्णाताई पाटील, शहराध्यक्ष सुनिल काळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी गांधी मैदान ते नगरपालिका कार्यालय ढोल ताशांच्या गजरात जोरदार रॅली काढण्यात येवून भाजपने मनोमिलनाच्या विरोधात रणशिंग फुंकल्याची सलामी दिली. सुवर्णा पाटील या रॅलीच्या अग्रस्थानी होत्या. सुमारे तासाभराच्या रॅलीनंतर भाजपचे शेकडो कार्यकर्ते उमेदवारांसह पालिकेत पोहचले आणि पहिल्या यादीतील अठरा उमेदवारांचे अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यात आले. उर्वरीत उमेदवारांची शनिवारी यादी सादर करणार असल्याचे दिपक पवार यांनी सांगितले.