Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीराजधानी सातार्‍यात परिवर्तनाची मुख्यमंत्र्यांकडून हाक

राजधानी सातार्‍यात परिवर्तनाची मुख्यमंत्र्यांकडून हाक

आर्थिक दहशतवादाच्या लढाईत सैनिक म्हणून सहभागी व्हा  * 2019 पर्यंत बेघरांना घे देणार
सातारा : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी गेल्या दोन वर्षापासून काळ्या पैशाच्या विरोधात मोठी लढाई सुरु केली आहे. त्यांनी सुरु केलेल्या लढाईत प्रत्येकांनी सैनिक म्हणून सहभागी व्हावे. केवळ 50 दिवस त्रास सहन करुन आपली देशभक्ती सिध्द करा. पुढील 50 वर्षात जगात भारताला कोणीही मागे खेचू शकणार नाही. मोदी यांनी एका रात्रीत नोटबंदीच्या निर्णयाद्वारे दहशतवाद, काळा पैसा व बनावट नोटा यांना जबरदस्त दणका दिला आहे.  या लढाईला मोठे संदर्भ असून त्याला सर्वांनी पाठबळ देवूया असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील गांधी मैदानावर जाहीर सभेत केले. ही भूमी छत्रपती शिवरायांची असून त्यांच्या आशिर्वादानेच आम्ही सत्तेवर आलो आहोत. ज्या सातार्‍याशी छत्रपतींचे नाव जोडले गेले आहे त्या सातार्‍यात परिवर्तन घडवून केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे आवर्तन मतदारांनी पूर्ण करावे अशी भावनिक साद फडणवीस यांनी घातली.
सातारा पालिकेच्या 34 उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील गांधी मैदानावर भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेमुळे जबरदस्त शक्तीप्रदर्शन झाले. या जाहीर सभेच्या निमित्ताने पक्षाच्यावतीने सातारा शहरातील नियोजित विकास कामांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात, अमित कुलकर्णी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णाताई पाटील प्रदेश उपाध्यक्षा निताताई केळकर, राज्य कार्यकारिणीची वरिष्ठ सदस्या कांताताई नलवडे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
cm-photo-1
यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, राज्यात ज्यांना घरे नाहीत अशा सर्वांनाच 2019 पर्यंत किमान 5 लाख घरे देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून ई गर्व्हनर्स व ई-प्रशासन या माध्यमातून सुस्पष्ट व पारदर्शी कारभार करण्याचे शासनाचे नियोजन आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात नगरविकास विभागातर्फे सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पायाभूत सुविधांच्या 32 योजना येत्या डिसेंबर पूर्ण करण्यात येणार आहे. बेघरांचे प्रस्ताव सातारा नगरपालिकेने तातडीने तयार करुन पाठवून द्यावेत त्यासाठी केंद्र शासन 80 टक्के व राज्य शासन 20 टक्के मदत निधी देणार आहे. मात्र गुणवत्तापूर्ण बदल प्रशासनात अपेक्षित असून पालिकांच्या खर्चाचे ऑडीट त्रयस्थ यंत्रणांमार्फत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ई-प्रशासनाअंतर्गत सुमारे 270 स्वरुपाच्या सेवा पालिकेमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असून येथून पुढे भविष्यात फिजीकली पालिकेत जाण्याची गरज नाही. तर डिजीटली सेवा दिल्या जाणार आहेत. घर बसल्या मालमत्ता पत्रके उपलब्ध करण्यात येणार असून त्याकरीता सर्व शहरातील मालमत्तांचे सॅटेलाइट मॅपींग करण्याचे नियोजन आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज आहे त्यासाठी सर्व नगरपालिकांना डिजीटल बुक देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजची उपस्थिती पाहता सुवर्णाताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे सुरुवातीलाच फडणवीस यांनी स्पष्ट करुन सातार्‍यात भाजपच्या सर्व मतदारांना साथ द्या आणि छत्रपती शिवप्रभूंच्या भूमीत परिवर्तन घडवा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती त्यांनी दिली. नोटबंदीच्या निर्णयाचे त्यांनी जोरदार समर्थन केले. सीमेपलिकडून येणारा काळा पैसा आणि दहशतवाद यांना या निर्णयाने जबरदस्त चपराक बसली आहे. तर काश्मीरमध्ये आज दगड मारायला एक युवक उपलब्ध नाही. हा निर्णय क्रांतीकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकवेळ संधी देवून बघा सातार्‍याच्या चेहरा-मोहरा बदलून दाखवू अशी ग्वाही दिली. नगरपालिकेच्या 40 जागांपैकी किमान 21 जागा मिळतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सातारा शहरातील जनतेला भाजपच हवे आहे. विधानसभा निवडणुकीत सातारा शहराने मला 3 हजारांचे मताधिक्कय दिले होते त्यामुळे नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणार यात शंका नाही असा विश्‍वास दीपक पवार यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणासाठी सरकार आग्रही
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मागण्या रास्त असून त्या समाजाच्या वेदनाही शासन गांभीर्याने समजून घेत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने लोककल्याणकारी योजना लागू करुन या प्रश्‍नावर काय सुवर्णमध्य काढायचा यावर चर्चा सुरु आहे. मराठा समाजातील लोकांच्या भावनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रश्‍नासंदर्भात प्रशासन पुरते संवेदनशील असून या प्रश्‍नावर मराठा नेत्यांशी चर्चेच्या वाटाघाटी अनेकदा झाल्या आहेत. या प्रश्‍नावर निश्‍चित तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ईबीसी सवलतीची मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेवून सर्वच विद्यार्थ्यांना एकप्रकारचा दिलासा दिला. त्यासाठी मराठा समाज आपला आभारी आहे असे दीपक पवार यांनी सांगत मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular