ग्रंथाचा सहवास लाभल्याने माझ्यातील कलाकार घडला: किरण माने

सातारा : (डॉ आनंद यादव नगरी) ग्रंथ आणि माझे अतुट नाते असून मला ग्रंथाचा सहवास लाभल्यानेच माझ्या जीवनाचे सोने झाले. माझी सातार्‍याबरोबर असलेली नाळ कधीही तुटणार नाही असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते किरण माने यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीतर्फे आयोजित केलेल्या 18 व्या ग्रंथमहोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामीथ कथाकार व प्रसिध्द लेखक व.बा. बोधे, सातारा जिल्हा ग्रंथ उत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस,प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, उपाध्यक्ष वि.ना. लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्रा. साहेबराव होळ, प्रल्हाद पार्टे, प्रकाशिका सौ सुनिता राजेपवार, सुनिता कदम, नंदा जाधव, प्रा. रविकांत नलगे, प्रा. प्रमोदिनी मंडपे, सौ निलीमा भोसले, अशोक वाळिंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अभिनेते किरण माने म्हणाले, मी ऐकण्याच्या भुमिकेत होतो, पण शिरीष चिटणीस यांनी मला मार्गदर्शन करण्यासाठी भुमिका स्पष्ट केली. यामुळे मी मार्गदर्शन करताना माझे भाग्य समजतो. भुतकाळामध्ये मी मला नाट्य कला क्षेत्रामध्ये संधी मिळावी म्हणून अनेक निर्मात्यांचे उंबरठे झिजवले. आजही मी सातार्‍यात स्वत:चे घर नसताना भाड्याच्या खोलीमध्ये रहात आहे. नाट्य कार्यक्रमामुळे मी मोठ मोठ्या शहरात गेलो तरी रहाण्यासाठी लॉजचा आसरा घेत असतो. माझ्या नवर्‍याची बायको’, यासारखे नाटके मी खुप स्ट्रगल करून यशस्वी केली आहेत. मला कुणीही गॉडफादर नाही, माझा गॉडफादर कोण, हे मला आता कळाले आहे.
चकोर चांदोबा, यासारखी पुस्तके मी वाचली. यामुळे ग्रामीण कथांचे वेड लागले. शंकर पाटील यांनी रेखाटलेले त्यांच्या कांदबरीमधील चावडीवरची माणसे मला उमजली. एक पात्री नाटक काय असते हे मला लवकर समजत नव्हते. तो मी नव्हेच. हे पहिले व्यावसायिक नाटक मी पाहिले आणि त्यानंतर आज अखेरपर्यंत दर्जेदार सात नाटकात यशस्वी काम केले आहे. ग्रंथांनी मला खुप मदत केली. पुस्तकाचा सार वाचला की, पुस्तकामध्ये लेेखकाने काय मांडले आहे हे तातडीने समजते. आपण सदा सुखात रहावे
असे प्रत्येकाला मनोमन वाटत असते. सुखासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. ग्रंथाची सोबत कधी मी सोडलेली नाही. माझ्या सोबतीला साहित्यीक आल्याने मी खुप सावरलो. असाध्य ते साध्य करून दाखवले. गाथाने माझ्या आयुष्यात जीवन उभे केले. त्यामधील 52 अध्याय निवडले. तुम्हाला अधिक काय व्हायचे ते प्रत्येकाने ठरवायला हवे मगच त्यादृष्टीने संघर्ष व लढत रहायला हवे. अनेकवेळा यश मिळविण्यासाठी काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो.
या प्रसंगी व.बा. बोधे म्हणाले, तुकोबा रायांची गाथा पाण्यावर तरंगली, हीच गाथा अभिनेत्या सारख्या कलांवताने वाचून त्याचे आयुष्य बदलले यावर माझा विश्‍वासच बसत नाही. किरण मानेसारख्या गुणी कलांवताने त्याच्या क्षेत्रात केलेली अथंग भरारी हे यशाचे गमकच म्हणावे लागेल. नेहमी गुणी माणसांवर अफाट प्रेम करीत असतात. लोक अभिनेता सलमान खानच्या भुमिकेबद्दल कौतुक करतात, त्याने शरीर उघडे करून दाखविले आहे. त्याचे आपण समर्थन करतो. मात्र दुसरीकडे एक शेतकरी त्याच्या शरीरावरील बनेल घामाने मळून गेले तरी त्याच्या कामाची दाद का घेत नाही. असे स्पष्ट करून ते म्हणाले, वास्तवतेकडे लोकांनी जास्त लक्ष द्यायला हवे. वाचनाने लोक शहाणे होत असतात. वाचन करीत गेल्यामुळेच मी पदवीपर्यंत शिक्षण घेऊ शकलो. कुठलाही माणूस वाईट नसतो. मात्र मराठी आज बिघडू लागली आहे. भाषा टिकून राहण्यासाठी त्याचे कोष तयार करून जतन करणे गरजेचे आहे. वसुंधरा पेंडसे यांनी हे काम अत्यंत काळजीने केलेले आहे. माझ्या कांदबरीमधील दीड ते दोन हजार शब्द त्यांनी कोष संग्रहामध्ये अभ्यासासाठी घेतलेले आहेत. एखादा शब्द समजला नाही तरी आजही मला फोन करून माहिती विचारत असतात. घर हे  ग्रंथांनी सजवायला हवे. सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवाचा झेंडा आता दिल्लीतच काय पण तो न्युयॉकपर्यंत जाऊन फडकेल असा मला विश्‍वास वाटतो. वाचकांची पत्रे हे प्रकाशकाच्या मानधनापेक्षा मोठे असते. यावेळी उत्कृष्ट चित्ररथांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गौरव करण्यात आला. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन प्रदीप कांबळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.