जिल्हाधिकार्‍यांच्या नव्या आदेशामुळे सातारा जिल्हा कारागृहालगतच्या 100 मिटर बाहेरील मिळकतधारकांना मोठा दिलासा

सातारा : सातारा जिल्हा कारागृहालगत 500 मीटर वर्तुळात असलेल्या मिळकतींच्या नवीन बांधकामांना मंजूरी देण्याचा प्रश्‍न बर्‍याच दिवसांपासून प्रलंबीत आणि जटील बनला होता. शासनाकडे याकामी आम्ही वेळोवेळी वस्तुस्थिती मांडली होती. त्यानंतर शासनाने 500 मीटर ऐवजी 100 मीटर अशी मर्यादा सुधारणा केली. नवीन झालेले बदल विचारात घेवून, जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकेचा नगररचना नियोजन विभाग आणि कारागृह व्यवस्थापनाचा अधिकारी वर्ग यांची नव्याने कमिटी गठीत करुन, त्या समितीच्या मान्यतेने 100 मीटर आतील मिळकतींच्या विकासाबाबत निर्णय घेतला जावा अशी आम्ही जिल्हाधिकारी यांना रास्त सूचना केली होती. काल जिल्हाधिकारी यांनी क्रेडाई, सातारा नगरपरिषदेचे नियोजन प्राधिकरण, आदींसमवेत बैठक घेवून अशी कमिटी स्थापन करण्याबाबत स्पष्ट मान्यता व आदेश दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे 100 मिटर बाहेरील मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी प्रतिक्रीया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खा. उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, जिल्हा कारागृहालगत 500 मीटर अंतराचे आंत असलेल्या खाजगी मिळकतधारकांना त्यांच्या वास्तु विकसित करावयाच्या आहेत तथापि शासनाचे सुरक्षितता आणि गोपनियता राखण्याच्या दृष्टीकोनामधुन 500 मीटरमधील बांधकामांना स्थायी सल्लागार समितीच्या मंजूरीने नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधकाम आराखडयांना मंजूरी देणे अपेक्षित होते. याकामी गठीत केलेल्या समितीची बैठकच होत नव्हती आणि झााली तरी निर्णय काही होत नव्हता अश्या विचित्र समस्येने हे मिळकतधारक त्रस्त झाले होते.
शासनाने गेल्या वर्षी 500 मिटर ऐवजी 100 मीटर असे मर्यादा अंतर कमी केले आहे आणि याकामी नगरपरिषद नियोजन प्राधिकरण आणि जिल्हा कारागृह अधिकारी यांची स्थायी समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी अशी सुधारणा केली आहे. ही सुधारणा केल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी यांना अशी समिती गठीत करणेबाबत सूचना केली होती.
जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या  निर्णयामुळे बर्‍याच मिळकतधारकांना दिलासा मिळणार असल्याने, जिल्हाधिकारी यांना आम्ही विशेष धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो अश्या शब्दात खा. श्री. छ.उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.