कराडमध्ये आघाड्यांची राजकीय जुळवाजुळव

कराड : येथील पालिका निवडणुक मतदानाची तारीख नुकतीच जाहीर झाली त्यानंतर खर्‍या अर्थाने शांत असलेल्या शहरातील राजकीय नेत्यांनी कात टाकून आपापल्या आघाडयांच्या जुळवाजुळवी बरोबरच डागडुजीला सुरूवात केल्याचे चित्र झपाटयाने दिसू लागले.
शहरातील नगराध्यक्ष पदाचे त्याचबरोबर प्रभागनिहाय उमेद्वारी बाबतची आरक्षणे जाहीर झाली आहेत. नुकताच आचारसंहिते बाबतीतील निवडणुक कार्यक्रमही जाहिर झाला आहे. शहरातील पालिकेच्या राजकीय पटलांवरील त्या दोन आघाडयांनी निवडणुकीच्या दृष्टीने हालचाल सुरूही केली आहे. परंतु इतर आघाडयांच्या नेत्यांची अजून भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे काही इच्छुक उमेद्वारांच्या दृष्टीने अडचण निर्माण झाली आहे. थोडया दिवसांतच निवडणुकीकरीता अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू होत आहे त्यामुळे शहरातील राजकीय नेत्यांची पळापळ सुरू आहे.
कराड नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व मानणार्‍या व सुभाषराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी व राजेंद्रसिंह यादव यांच्या यशवंतराव चव्हाण विकास आघाडीची पालिकेत सत्ता आहे तर विरोधकांची भुमिका जनशक्ती विकास आघाडी बजावत आहे. सत्ताधारी लोकशाही आघाडीतील काही नगरसेवकांत अंतर्गत नाराजीचा सुर आहे. पालिकेतील लोकशाही आघाडीच्या समर्थन देणार्‍या यशवंतराव चव्हाण विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी काही दिवसांपूर्वी लोकशाही आघाडीने आयोजित केलेल्या मेळाव्यास अनुपस्थिती दर्शविली त्यामुळे यादव यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.
विधानसभेला पराभुत झालेले कराड दक्षिणचे आमदार विलासराव पाटील(काका) उंडाळकर यांनी शहरात कार्यकर्त्यांची फळी निर्माण व्हावी. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत शहरातील मतांचा हातभार लागावा. तसेच पालिकेच्या निवडणुकीत काही नगरसेवक विजयी झालेच तर पालिकेतील राजकीय पटलावर नांव यावे या भुमिकेतुन त्यांनी माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड शहर विकास आघाडीची स्थापना करून पालिकेच्या निवडणुकीत दंड थोपटले आहेत. माजी आमदार विलासराव पाटील (काका) गटाने व यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या समर्थकांचा एकत्रित मेळावा येथील एका मंगल कार्यालयात पार पडला होता. या मेळाव्यात त्यांनी होऊ घातलेल्या जि.प.पं.स व न.पा. च्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे भाष्य केले होते. मात्र युवा नेते अतुल भोसलेंनी कराड दक्षिणेतून भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यानच्या काळात भाजपने त्यांच्यावर राज्य सरचिटणिस पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यात भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पालिकेच्या निवडणुकीत पक्ष चिन्हावर निवडणुक लढविण्याचे जाहिर केले आहे. काही महिन्यापूर्वी जिल्हयातील लोणंद नगरपंचायतीमध्ये पावसकर यांनी पक्ष चिन्हावर निवडणुक लढवून काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या सातारा जिल्हयात लोणंद निवडणुक पॅटर्न द्वारे भाजपचा यशस्वी चंचु प्रवेश नगरपंचायतीच्या रूपाने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कराडची निवडणूक पक्ष चिन्हावर लढविण्याचा त्यांचा मानस असावा मात्र युवा नेते अतुल भोसले यांनी याबाबत आपली भुमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

 

राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण गटाने स्वबळावर कराड नगरपरिषदेची निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. त्यांच्याबरोबरच पालिकेच्या राजकारणातील अर्बन ग्रुप, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, माजी नगरसेवक अरूण जाधव व त्यांचे सहकारी समर्थकांची भुमिका आज मितीला समनवयाची आहे असे असले तरी अर्बंन ग्रुपची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. परंतू जुन्या सर्व समर्थंकाना एकत्र घेऊन निवडणूकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न आमदार चव्हाण गटाने चालविला आहे. एकूणच येत्या आठवडयाभरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट होईल अशी आशा आहे. त्यानंतर खर्‍या अर्थाने कोण कोणाबरोबर जाणार ? तसेच कोणत्या गटाचे नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे उमेद्वार कोण असणार ? हे समजेल त्यानंतरच एकूण शहरातील निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील अंदाज बांधणे सहज सोपे होणार आहे.या महिन्याच्या 29 तारखेपर्यंत त्याकरिता वाट पहावी लागणार आहे.