मानवी आरोग्याबरोबर निसर्गाचेही आरोग्य जपणे आवश्यक : सौ. वेदांतिकाराजे ; कर्तव्यच्या सातार्‍यातील शिबिरात 620 रुग्णांची तपासणी 

सातारा : कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण, निसर्ग रक्षणाबरोबरच जनसामान्यांची सेवा करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. मोतीबिंदू शिबिर असेल किंवा मोफत जयपूर फूट वाटप शिबीर असेल, अशा विविध प्रकाराच्या आरोग्य विषयक शिबीरातून पिडीत लोकांना आपले जीवन आनंदाने जगता यावे, यासाठी प्रयत्न केले जातात. आज पर्यावरणाचा प्रश्‍न गंभिर बनला आहे. पर्यावरणाच्या हानीमुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे मानवी आराग्याबरोबरच निसर्गाचेही आरोग्य जपणे आवश्यक असून यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने हत्तीखाना  येथे मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे भोसले बोलत होत्या. यावेळी नगरसेवक सौ. लिना गोरे, रविंद्र ढोणे, निळकंठ पालेकर, जयश्री उबाळे, अजित साळुंखे, पल्लवी घोडके, रशिदभाई बागवान, मुज्जफर खान, ज्ञानूआप्पा लोहार, दत्ता कारंडे, गजेंद्र ढोणे, तात्या भणगे, विजय शिंदे, प्रकाश मोहिते, चंद्रकांत रसाळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.  गेली 12 वर्ष कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून मानवाच्या आरोग्याबरोबरच निसर्गाचे आरोग्य जपण्याचे कार्य सुरु आहे. ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शिबीरामुळे आतापर्यंत सुमारे 18 हजार लोकांना नवी दृष्टी मिळाली आहे. मोतिबिंदू रुग्णांना नवी दृष्टी मिळावी त्यांना पुढील आयुष्य सुखकर व्हावे, या उद्देशाने ठिकठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात येत असते. या ग्रुपचे कार्य मी गेल्या अनेक वर्षांपासून जवळून पाहिले असून हे कार्य इतरांना प्रेरणादायी ठरत आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक रशिदभाई बागवान यांनी यावेळी केले आणि कर्तव्य ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे. याशिवाय प्लास्टीक मुक्त परिसर करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने प्लास्टीक मुक्ती होणार आहे. पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवर्धन ही एक सामाजिक जबाबदारी असून यासाठी सर्वांनी प्रत्यक्ष कृती करुन योगदान द्यावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले. शिबीरात 620 रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली तर, 82 रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुण्याला पाठवण्यात आले. तसेच 290 रुग्णांना अत्यल्प दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या विलास कासार, विजय देशमुख, चंदन घोडके, जितू मोहिते, संदीप भणगे, राजेंद्र चोरगे, महेश यादव, दिलावर शेख, दिपक भोसले, गौरव पवार, नाना इंदलकर, सुधीर जाधव, सुहास ओव्हाळकर, मुस्ताक शेख, सादीक बागवान, प्रतिक भद्रे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.