कर्तव्यमुळे दिव्यांग बांधवांना मिळाले कृत्रीम अंग

सातारा : कर्तव्य सोशल ग्रुपच्या 11 व्या वर्धापनदिनानिमीत्त अपघात अथवा आजारामुळे अपंगत्व आलेल्या लोकांसाठी मोफत कृत्रीम हात व पाय (जयपूर फूट) बसवण्याच्या शिबिरात तब्बल 171 दिव्यांग बांधवांना कृत्रीम अवयवांचे मोफत वाटप करण्यात आले. पर्यावरण, निसर्ग रक्षणाबरोबरच जनसामान्यांची सेवा करण्याचे काम कर्तव्यच्या माध्यामातून अविरतपणे सुरु आहे. मोतीबिंदू शिबिर असेल किंवा मोफत जयपूर फूट वाटप शिबिर असेल, अशा विविध प्रकाराच्या आरोग्य विषयक शिबीरातून पिडीत लोकांना आपले जीवन आनंदाने जगता यावे, यासाठी प्रयत्न केले जातात. कर्तव्यच्या आजच्या शिबिरात सातारा जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरुन असंख्य दिव्यांग बांधव आले आहेत. या सर्व बांधवांना कृत्रीम हाप, पाय, कॅलिपर, व्हील चेअर देण्यात आले असून या सर्वांचे जीवन सुसह्य करता आले, याचे कर्तव्य ग्रुपला मनस्वी समाधान वाटत आहे, असे प्रतिपादन ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

सातारा नगरपरिषद मंगल कार्यालयात स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या 11 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्तव्य सोशल ग्रुप, साधूवासवाणी मिशनच्या इनलॅक्स आणि बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात अथवा आजारामुळे अपंगत्व आलेल्या लोकांसाठी मोफत कृत्रीम हात व पाय (जयपूर फूट) बसवण्याच्या शिबिरात आवश्यक अवयवांचे माप दिलेल्या अपंग बांधवांना मोफत जयपूर फूटचे वाटपप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे भोसले बोलत होत्या. यावेळी डॉ. मिलींद जाधव, डॉ. सलील जैन, डॉ. सुशिल ढगे, सुशांत राऊत, जितेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबीरात 171 रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार हात, पाय, पाच रुग्णांना व्हील चेअर, 10 जणांना वॉकर, 12 जणांना कुबड्या तर, 20 रुग्णांना कॅलीपरचे मोफत वाटप करण्यात आले. बहुतांश दिव्यांग बांधव शेतकरी अथवा कष्टकरी असतात. त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांच्या दैनंदीन कामकाजात त्यांच्या शरीराला या कृत्रीम अवयवांमुळे मदत मिळावी, या उद्देशाने या शिबीराचे आयोजन केले जात असून त्याचा लाभ घेण्यासाठी आज असंख्य पुरुष आणि महिला उपस्थित राहिल्या याबद्दल सौ. वेदांतिकाराजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तुमच्या उपस्थितीमुळे कर्तव्य ग्रुपची सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा दिवसेंदिवस वृध्दींगत होते, असे सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या