खंडाळा कारखान्याचा बुधवारी गळीत हंगाम शुभारंभ

भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने उभारणी करून चालविण्यास घेतलेल्या खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2016-17 च्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवारी (दि.9) सायंकाळी सव्वा चार वाजता कणेरी (जि. कोल्हापूर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानचे महास्वामी परमपूज्य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती किसन वीर उद्योग समुहाचे प्रमुख मदनदादा भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, खंडाळा तालुक्याच्या कृषी औद्योगिक विकासाला चालना देणार्‍या खंडाळा साखर कारखान्याची उभारणी पुर्ण होऊन गतवर्षी यशस्वी चाचणी गळीत हंगाम झाला. यंदाचा पहिला गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्धार व्यवस्थापनाने केलेला असुन त्यादिशेने सर्व तयारी करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नेते प्रतापरावभाऊ भोसले व शंकरराव गाढवे यांच्यासह तत्कालीन सहकार्‍यांचे शेतकर्‍यांच्या मालकीच्या साखर कारखान्याचे स्वप्न पुर्ण होऊन प्रत्यक्षात हा कारखाना सुरू होत असल्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
खंडाळा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक, कार्यकर्ते आणि विविध  संस्थांचे पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले