किसनवीर कारखाना हा सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्माचे केंद्र : संभाजीराव कडु-पाटील

भुईंज: राज्यातील अन्य साखर कारखान्यांच्या तुलनेत सर्व समावेशक चौफेर विकास किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाने साधला आहे. शेतकर्‍यांचे हित जपणारा हा साखर कारखाना सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक केंद्र झाला आहे, असा विश्‍वास राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडु-पाटील यांनी व्यक्त केला.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि वाई तालुका अ‍ॅग्री डिलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने किसन वीर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन संभाजीराव कडु-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, डॉ. सौ. निलिमा भोसले, खंडाळा कारखान्याचे चेअरमन शंकरराव गाढवे, प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, अ‍ॅड. विजयराव कणसे, कोल्हापूरचे विभागीय कृषी सह संचालक महावीर जंगटे, वाईच्या नगराध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ. सी. जी. बागल, उपविभागीय कृषि अधिकारी विजय माईनकर, सिनेकलाकार व लागिरं झालं जी च्या निर्मात्या श्‍वेता शिंदे यांच्यासह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात मदनदादा भोसले यांनी गेल्या चौदा वर्षात सतरा हजार फळ झाडांची लागवड करण्यात आलेली असून अखंड नामयज्ञ सोहळ्याच्यानिमित्ताने आयोजित कृषी प्रदर्शनातून कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाने भरघोस कृषी उत्पन्न घेण्यास ऊर्जा व प्रेरणा मिळेल असे सांगितले.
प्रारंभी सकाळी साखर आयुक्त संभाजीराव कडु-पाटील, कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, शंकरराव गाढवे, डॉ. सौ. निलिमा भोसले, अ‍ॅड. विजयराव कणसे, कोल्हापूर विभागीय कृषी सह संचालक महावीर जंगटे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ. सी. जी. बागल, उपविभागीय कृषि अधिकारी विजय माईनकर,  शेतकरी, वारकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हस्ते अवघ्या दहा मिनिटात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे…या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाच्या गजरात कार्यस्थळावरील मोलॅसिस टॅक फार्म परिसरात नरेंद्र बोर, कवठ, हनुमान फळ, बेल आदी जातींच्या एक हजार रोपांची लागवड करण्यात आली.
त्यानंतर साखर आयुक्त संभाजीराव कडु-पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कृषी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध स्टॉलना यावेळी या सर्व मान्यवरांनी भेट देवून पाहणी केली. कारखाना व शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन श्‍वेता शिंदे यांच्या हस्ते आणि डॉ. सौ. निलिमा भोसले, कारखान्याच्या संचालिका सौ. विजया साबळे, सौ. आशा फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. पुष्प प्रदर्शनात मांडण्यात आलेली रंगीबेरंगी फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सर्व मान्यवरांनी पुष्प प्रदर्शनाचीही पाहणी केली. मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाने केला. सुत्र संचालन दत्तात्रय शेवते यांनी केले तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी मानले.