किसनवीरच्या पर्यावरण चळवळीची नोंद सुवर्णअक्षरांनी नोंदली जाईलःडॉ. सी. जी. बागल  


भुईंज : अवघ्या 12 वर्षांमध्ये एक साखर कारखाना पर्यावरण समृद्धीसाठी पुढाकार घेत एक चळवळ राबवतो काय आणि त्यातून तब्बल 1 लाख 96 हजार झाडे लागतात काय? हे एक आश्‍चर्य असून हे आश्‍चर्य साकारणारी संस्था किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना आहे, याचा विशेष आनंद वाटतो. सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात आणि पर्यावरण चळवळीच्या क्षेत्रात किसन वीर कारखान्याची ही कामगिरी सुवर्णअक्षराने नोंदली जाईल, असा विश्‍वास जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ. सी. जी. बागल यांनी व्यक्त केला. 
किसन वीर साखर कारखान्याच्यावतीने ना नफा ना तोटा या तत्वावर फळरोप विक्रीचा शुभारंभ डॉ. बागल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. बागल पुढे म्हणाले, कारखाना कार्यस्थळावर गेल्या बारा वर्षात तब्बल 21 हजारांहून विविध झाडे लावली आणि जगवली त्याचबरोबर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना दरवर्षी ना नफा ना तोटा या तत्वावर दर्जेदार फळरोपे उपलब्ध करुन दिली गेली. त्याचा आकडा 1 लाख 75 हजारांच्या पुढे गेला आहे. अशाप्रकारे तब्बल 2 लाख वृक्षारोपणाच्या समिप पोहोचलेली ही चळवळ आनंददायी आणि हिरवं स्वप्न साकारणारी आहे. वृक्षलागवड ही वेगवेगळ्या पातळ्यांवर केली जात असली, तरी कारखाना कार्यस्थळावर आणि कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी केलेल्या वृक्ष लागवडीमध्ये फळझाडे जगण्याचे प्रमाण हे 95 टक्क्यांपेक्षाही जास्त असून ही वृक्ष लागवडीमधील एक उल्लेखनीय बाब आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी उपलब्ध केली जाणारी दर्जेदार फळझाड रोपे ही कृषी विद्यापीठामधून एक वर्ष आगाऊ नियोजन करून शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली जातात, जी गोष्ट शेतकर्‍यांना वैयक्तिक पातळीवर सहज शक्य होत नाही. खर्‍या अर्थाने वृक्ष लागवडीतून पर्यावरण रक्षणाचे आणि संवर्धनाचे उत्कृष्ठ काम किसन वीर कारखान्याच्या नेतृत्वाने केलेले आहे, असेही ते म्हणाले.
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ आणि मलकापूर (कोल्हापूर) येथील शैलेश नर्सरीमधून केशर, रत्ना, हापूस या जातींचे आंबा, प्रताप, बाणवली, ऑरेंज डॉर्फ या जातीचे नारळ, बाळानगर सिताफळ, कालीपती चिकू, थायलंड, प्रतिष्ठान चिंच, सरदार पेरू, साई सरबती लिंबू आणि कोकण बहाडोली या जातीचे जांभूळ अशी विविध फळझाड रोपे कारखाना कार्यस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेली असून कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी मदनदादा भोसले यांनी केले. 
कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रविण जगताप, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, भगवानराव आवडे, विजया साबळे, आशा फाळके, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, डॉ. दत्तात्रय फाळके, मनोज पवार, अतुल पवार, केशव पिसाळ, सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.