मानवी जीवनासाठी विज्ञान साहित्याची भूमिका जागल्याची: जावडेकर

सातारा: विज्ञान साहित्य हे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे वैज्ञानिक वस्तुस्थिती आणि दुसरे म्हणजे भविष्याचे चित्रण. विज्ञान भविष्याबद्दल अनेक गैरसमज असले तरी त्यातील कथामध्ये भविष्याचे वर्णन असते. त्यामुळे मानवी जीवनासाठी विज्ञान साहित्य जागल्याची भूमिका निभावतो असे मत विज्ञान साहित्यिक सुबोध जावडेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहुपुरी शाखा आणि छत्रपती शिवाजी कॉलेज संयुक्त विद्यमाने तिस-या सातारा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक प्रा.डॉ. शरद नावरे, प्रमुख पाहुणे प्राचार्य गणेश ठाकूर, स्वागताध्यक्ष उद्योजक संतोष यादव, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, सोपानराव चव्हाण आणि मान्यवर उपस्थित होते.
श्री.जावडेकर पुढे म्हणाले, विज्ञान कथेची ठोसपणे व्याख्या करु शकत नाही मात्र त्याची वैशिष्टये सांगू शकतो. त्याचप्रमाणे एखादी कथा विज्ञानाच्या पाशर्वभूमीवर लिहिलेली असेल तर ती विज्ञानकथा होऊ शकत नाही हे त्यांनी उदाहरणासह सांगितले. विज्ञान प्रगत होत असताना समस्या निर्माण होतात त्याला सामोरे कसे जायचे याबाबत केलेले लिखाण म्हणजे विज्ञान कथा म्हणता येईल. त्यात भविष्याचे चित्रण असते. या कथामधील केंद्रबिंदू विज्ञानावर नसून माणसावर हवा. नवीन विज्ञान साहित्यिकांना लिहितांना त्यात विज्ञान घालण्याचा अट्टहास नको. महितीचा भडीमार नको ती माणसाची कथा व्हायला हवी. सद्यस्थितीवर भाष्य करणारा कथा ही विज्ञान साहित्याचा एक प्रकार होऊ शकतो. त्यात भविष्याविषयी सूक्ष्म भाष्य असले तर त्याची ओळख विज्ञान साहित्य म्हणून होऊ शकते. यावेळी त्यांनी डॉ. अरुण मांडे यांनी लिहिलेल्या कनेक्शन तसेच स्वतः लिहिलेल्या संगणक कधी चुकत नाही, नियतीशी करार, आणि अखेरची साक्ष या कथाची कथासूत्र सांगितली त्यातून त्यांनी विज्ञान कथा जागल्याची भूमिका कशाप्रकारे निभावू शकतात हे उदाहरणासह स्पष्ट केले. अशाप्रकारच्या कथांमध्ये काल्पनिक कथासूत्र असल तरी ते भविष्यात तसे घडू शकते याबाबत मनुष्याला इशारा देण्याचे काम करते. सद्यस्थितीत एखादी आठवण पुसून टाकणे किंवा नवीन निर्माण करणे याबाबत उंदिरावर प्रयोग झाले असले तरी मनुष्यावर झालेले नाहीत परंतु ते होऊच शकणार नाही हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र तसे झाले तर त्याचा सर्वप्रथम फटका न्यायव्यवस्थेला बसेल कारण न्यायव्यवस्था ही साक्षी, पुरावे, प्रत्यक्ष साक्षीदार यावर आधारलेली आहे असे त्यांनी सांगितले.
संमेलनाचे उदघाटक प्रा. डॉ. शरद नावरे म्हणाले, विज्ञानाची प्रगती झाली असून नवनवीन शोध लागत आहे. तंत्रज्ञानामुळे जीवन व्यापून गेले आहे. तंत्रज्ञान वर्तमान आणि तर विज्ञान भविष्य आहे. प्रारंभीच्या काळात इतर प्राण्यापासून वेगळे होण्यासाठी मनुष्याने धर्म आणि ईश्वराची संकल्पना वापरली. आता त्याची जागा विज्ञानाने घेतली आहे.17 व्या शतकातील संशोधक जर 19 व्या शतकात आला तर त्याला काही गोष्टी ख-या वाटणार नाहीत.
संमेलनाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य ठाकूर यांनी अशा प्रकारचे संमेलन आयोजित केल्याबद्दल मसाप शाहुपुरी शाखेला धन्यवाद दिले. साहित्य विद्याथर्यांपर्यत पोहचले तरच साहित्यिक तयार होतील. विद्याथर्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम महाविद्यालयात राबवले जातात, त्यापैकीच एक म्हणजे हे संमेलन आहे. कर्मवीर आण्णाचे धोरण आणि आचरण हे विज्ञाननिष्ठ होते याबाबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या पायाभरणीचा प्रसंग सांगितला. कर्मवीरांची विवेकाची भूमिका प्रखर होती. मराठी विद्याथर्यांपर्यंत विज्ञान पोहचल पाहिजे. शोध जरी इंग्रजीत असले तरी ते मराठी विद्याथर्यांपर्यंत पोहचण्यासाठी वैज्ञानिक साहित्य महत्वाची भूमिका नोंदवू शकतात.
संमेलनाचे संमेलनाध्यक्ष उद्योजक संतोष यादव यांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात होत असलेल्या संमेलनामुळे विशेष आनंद असल्याचे सांगितले. या महाविद्यालयाच माजी विद्यार्थी या नात्याने संमेलनाबाबत मला उत्सुकता होती. नवीन साहित्यिक निर्माण व्हावेत यासाठी महाविद्यालयात संमेलन आयोजित करण्यात आले. ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले त्याठिकाणी व्यासपीठावर बोलण्याचा आनंद दुर्मिळ असून नवीन साहित्यिक घडो अशी सदिच्छा व्यक्त केली. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करुन संमेलनाचे उदघाटन झाले.
यावेळी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात संमेलनाचे निमंत्रक आणि मुख्य संयोजक विनोद कुलकर्णी म्हणाले, गेल्या वर्षापासून आम्ही संमेलनाचे आयोजित करत असलो तर त्याच्या आयोजनाचा उद्देश आज ख-या अर्थाने सफल झाला. साहित्य चळवळ विद्याथर्यांपर्यंत पोहचावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्याला छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे सहकार्य मिळाले. मसाप शाहुपुरी शाखा गेल्या पाच वर्षांपासून विविध उपक्रम राबवते. साहित्याविषयी विचार विद्याथर्यांपर्यंत पोहचले तरच नवीन साहित्यिक घडू शकतात. महाविद्यालयाबरोबर सामंजस्य करार हा दोघांसाठी अभिमानास्पद असून मसापच्या 110 वर्षाच्या इतिहासात प्रथमच मसाप शाहुपुरी शाखेने अशा प्रकारचा सांमजस्य करार केला.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम.एस.शिंदे, कार्याध्यक्ष अमोल मोहिते, प्रमुख कार्यवाह किशोर बेडकिहाळ, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, प्रवीण पाटील, डॉ.उमेश करंबळेकर, प्रा. महेश गायकवाड, राजेश जोशी, प्रा. डॉ. कांचन नलावडे, प्रा.डॉ.गजानन चव्हाण, विकास धुळेकर, वजीर नदाफ, प्रा. डॉ. मानसी लाटकर, अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, संजय माने, अजित साळुंखे, राजू गोडसे, मसापचे सदस्य, छत्रतपी शिवाजी महाविद्यालयतील मराठी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. संमेलनस्थळी विज्ञानविषयक भित्तीपत्रकाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यात डॉ. गजानन फोंडके, डॉ. जयंती नारळीकर, डॉ. निरंजन घाटे यांच्या कार्याचा परिचय देण्यात आला होता. सूत्रसंचालन प्रा. गजानन चव्हाण, डॉ. संजयकुमार सरगडे यांनी तर आभार प्रा. डॉ. शिवलिंग मेणकुदळे यांनी मानले.