कानाकोपर्‍यावर पोलीस तैनात

सातारा : सातार्‍यात आज होणार्‍या मराठा क्रांती मोर्चासाठी पोलीस आणि महसूल यंत्रणा सज्ज झाली असून रविवारी सायंकाळी सहा नंतर पोलीस कर्मचार्‍यांना नेमून दिलेल्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. पोलीस कर्मचारी तैनात करत असतानाच पोलिसांनी मोर्चा मार्गावरील टपर्‍या, हातगाड्या आणि इतर अतिक्रमणे हटवत मार्ग मोकळा करुन घेतला. मोर्चाच्या बारीकसारीक घडामोडींवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सातार्‍यात सोमवारी होणार्‍या मराठा क्रांती मोर्चासाठी सुमारे 25 लाख मराठा बांधव एकत्र येतील, असा अंदाज शासकीय आणि पोलीस यंत्रणेकडून वर्तविण्यात येत आहे. या अंदाजानुसार आणि गावोगावी झालेल्या बैठकांचा अंदाज घेत पोलीस यंत्रणेने बंदोबस्ताचे आणि पार्किंग व्यवस्थेचे नियोजन केले आहे. हे नियोजन करत असतानाच मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवत असतानाच पोलिसांनी संपूर्ण मोर्चा मार्गावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यासाठीचा नियंत्रण कक्ष तयार केला आहे. या नियंत्रण कक्षाची संपूर्ण सूत्रे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
मोर्चासाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना रविवारी सायंकाळी सहा नंतरच्या तैनातीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. तैनातीच्या ठिकाणी संबंधित कर्मचार्‍यांना आवश्यक असणार्‍या सोयी पुरविण्यात इतर यंत्रणा गुंतल्या होत्या. मोर्चाच्या पˆत्येक हालचालीवर पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे लक्ष ठेवून राहणार असून त्यांच्या मदतीसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार हे कार्यरत राहणार आहेत. याचबरोबर 9 पोलीस उपअधीक्षक, 106 पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, 2086 पोलीस कर्मचारी आणि तितकेच गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. या पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या, जलद कृती दल, बाँब शोधक आणि नाशक पथके आणि सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मोर्चासाठी तयार केलेल्या बंदोबस्त स्थळांवर स्वतंत्रपणे वायरलेस यंत्रणा उभारण्यात आली आहे. मोर्चा मार्गावर नजर ठेवण्यासाठी मनोरे पोलिसांच्या वतीने उभारण्यात आले आहेत. मोर्चेकरी महिलांच्यासाठी मोर्चा मार्गावर फिरती शौचालये ठेवण्यात आली असून त्यासाठी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेची मदत घेण्यात आली आहे.
चौकट ः दहा रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची पथके तैनात

 

मोर्चा मार्गावर आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ कुमक त्याठिकाणी पोहोचवता यावी, यासाठी दहा रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची पथके तयार करण्यात आली आहेत. याचबरोबरच मोर्चेकर्‍यांच्या वाहनांमध्ये काही बिघाड झाल्यास ती मार्गावरुन हटविण्यासाठी 4 क्रेन आणि टोईंग व्हॅन तसेच अग्निशामक पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. मोर्चाच्या कालावधीत समर्थ मंदिर चौक ते शाहूचौक आणि मोतीचौक ते पोलीस मुख्यालय आणि तिथून पुढे काँगˆेस भवन पर्यंतचा मार्ग आपतकालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला असून या मार्गावर पोलीस आणि आरोग्य पथकाची तसेच अग्निशामक वाहनाव्यतिरिक्त इतर वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.