सकल मराठा समाज उद्या आमदारांना भेटणार ; जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देणार

सातारा : महाराष्ट्रच नव्हे तर अगदी सातासमुद्रापारही मराठा क्रांती मोर्चाचा डंका वाजत आहे. मुंबई, नागपूर वगळता राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. गेले दोन महिने ही प्रक्रिया सुरु आहे. तरीही राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. मराठा समाजाचा हा दबलेला हुंकार आता वेगळ्या संघर्षावर येऊन ठेपला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाज आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहे. सातारा येथे शनिवारी, दि. 3 रोजी सकल मराठा समाज सातारा जिल्ह्यातील सर्व आमदारांना नियोजन समिती बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात भेटणार आहे आणि एक निवेदन देऊन जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्व आमदारांनी नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनात मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवर आवाज उठवावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. यावेळी सातारा जिल्ह्यातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
कोपर्डी, जि. अहमदनगर येथील घटनेनंतर महाराष्ट्र आणि राज्याबाहेर राहणारा मराठा समाज अस्वस्थ तर झालाच आहे त्याचबरोबर संतप्तही झाला आहे. या प्रकरणातील नाराधमाना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर ऍट्रॉसिटी कायद्याच्या दुरुपयोगाबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी आणि इतर मागण्यांसाठी गेले दोन महिने राज्यातील मराठा समाज मूक मोर्चा काढून आपली वेदना समाजासमोर मांडत आहे. असे असतानाही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाने आपले मागण्यांचे 26 पानी निवेदन राज्यातील सर्व आमदारांना देण्यात येणार आहे. सातारा येथेही शनिवारी हेच निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनात प्रत्येक मागणी आणि त्यामागील भूमिका सविस्तर स्पष्ट केली आहे.
सर्व जिल्ह्यातल्या मराठा क्रांती मोर्चाच्या एकत्रित मागण्यांवर विधीमंडळाचा हिवाळी अधिवेशनात सर्वपक्षीय सर्वधर्मिय आमदारांनी विधीमंडळात आवाज उठवावा, अशी प्रमुख भूमिका यावेळी आमदारांना सांगण्यात येणार आहे. येथे कोणताही मराठा बांधव घोषणा देणार नाही. दरम्यान,प्रत्येक तालुक्यातील मराठा बांधवांनी हजारोंच्या संख्येने शनिवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज, सातारा जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले आहे.