मनसे राज्य उपाध्यक्ष मोझर यांचे सहाव्या दिवशी उपोषण मागे

कुमुदाच्या संचालकांची संपत्ती जप्तीचे आश्वासन
सातारा : रयत-कुमुदा साखर व्यवस्थापनाने 27 महिन्यांपासून रखडवलेल्या ऊस बिलप्रश्‍नी मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी सुरू केलेले उपोषण कुमुदाच्या संचालकांची संपत्ती जप्त करून शेतकर्‍यांची देणी भागविण्याचे आश्वासन देवून शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य झाल्याने व साखर आयुक्तांशी 16 जानेवारी रोजी पुण्यातील बैठकीचे लेखी आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिल्याने सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले.
 अप्पर जिल्हादंडाधिकारी भारत वाघमारे यांनी प्रशासनाच्यावतीने संदीप मोझर यांना लेखी पत्र देवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी आपल्या समर्थकासह लिंबू सरबत घेवून उपोषण मागे घेतले.
 उपोषण मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोझर म्हणाले हे माझ्या सामाजिक, राजकीय कारकिर्दींतील पहिलेच उपोषण होते. पुण्यातील बैठकीत मी शेतकर्‍यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कटीबध्द आहे.याबाबत कसलाही हलगर्जीपणा अथवा त्यांची छळवणूक, अडवणूक केल्यास सहन करणार नाही. मग्रुर कारखानदारांची संपत्ती विकून शेतकर्‍यांची देणी देण्याचा प्रघात या आंदोलनाच्या यशामुळे निर्माण झाल्याचे समाधान वाटते असेही नमुद केले. आंदोलनाच्या वेळी संपुर्ण जिल्ह्यातील मनसेसैनिक, शेतकरी, कार्यकर्ते व सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान,सलग 25 दिवस धरणे आंदोलन आणि सहा दिवस आमरण उपोषण चालू असताना नेतेमंडळी इकडे फिरकलेली नसले तरी सर्वसामान्य शेतकरी मनसे सैनिक विद्यार्थी तरूण मंडळी कार्यकर्ते यांनी भेट देवून माझे बळ वाढविले आहे. यापुढे कुणी त्यांना त्रास दिला किंवा अडवणूक केल्यास गाठ माझ्याशी आहे असा इशाराही यावेळी दिला.