आदिशक्तीच्या जागराला वरूणराजाची हजेरी

सातारा : दुर्गा माता की जय, आंबा माता की जयघोषात आज संपुर्ण सातारा जिल्ह्यात सायंकाळी 6 पर्यंत 1720 पैकी 943 सार्वजनिक नवरात्रऊत्सव मंडळांनी दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली. प्रतिष्ठापनेदिवशीच दमदार वरून राजाने हजेरी लावल्याने भर पावसातही मंडळांनी ढोल, ताशा या पारंपारिक वाद्याच्या गजरात ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक काढून दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली.
सातारा शहर व उपनगरात एकुण 43 सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळापैकी सायंकाळी 5.30 पर्यंत 15 मंडळांनी वाजत गाजत दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली. यावर्षी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यात मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेवर भर देवून परिसरात स्वागत कमान उभारण्यात आल्या आहेत. या शिवाय विद्युत रोषणाईवर भर देण्यात आली आहे.

 

दरम्यान, नवरात्र उत्सवात कायदा व सुव्यवस्था चोख रहावी म्हणून जिल्हा पोलीस दलाच्यावतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकुण 29 पोलीस ठाण्याअंतर्गत बंदोबस्तासाठी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 7 पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक 75, पोलीस कर्मचारी 1650, होमगार्ड 600, एक केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नऊ दिवस सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये भजन, किर्तन, प्रवचन, दुर्गा दौंड, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. यावर्षी दुर्गा देवीच्या प्रतिष्ठापनेला पावसाने हजेरी लावल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. अजिंक्यतारा येथील मंगळाईदेवी, औंध येथील यमाईदवी, प्रतापगड येथील श्रीतुळजाभवानी, नवरात्रीमुळे विशेष पुजा करण्यात आली होती.