पतसंस्था फेडरेशनवर पुन्हा भागधारकाचीच सत्ता, काका पाटील चेअरमन, राजेंद्र चव्हाण व्हाईस चेअरमन

सातारा : सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची सत्ता पुन्हा भागधारक पॅनेलकडे खेचून आणण्याचा चमत्कार पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी, विद्यमान संचालक अविनाश कदम आणि नरेंद्र पाटील या त्रिकुटाने घडवून दाखवला. विरोधी पॅनेलमधून प्रकाश ऊर्फ काका पाटील यांना भागधारक पॅनेलमध्ये घेऊन त्यांनाच चेअरमन करण्याचा निर्णय मतपेटीतही यशस्वी ठरला. व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र चव्हाण यांना पुन्हा संधी देण्यात आली. विरोधी पॅनेलचे प्रमुख प्रभाकर साबळे आणि काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. धनश्री महाडिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. या निवडणुकीत भागधारक पॅनेलला 10-9 अशा निकालाने धक्का बसला होता. भागधारक पॅनेलची सत्ता गेली होती मात्र निकालानंतर भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी, अविनाश कदम, नरेंद्र पाटील यांच्यासह सर्वच संचालकांनी सत्ता खेचून आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व संचालक मंडळ कामाला लागले. त्यानुसार विरोधी पॅनेलमधील अनेकांनी भागधारकमध्ये येण्याची तयारी दाखवली होती. ज्यांनी भागधारक पॅनेलमध्ये येण्याची तयारी दाखवली त्यांच्या नावाची चर्चा नेत्यांशी करण्यात आली. त्यानंतर विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहारजे भोसले, आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील-वाठारकर यांनी काका पाटील यांच्या नावावर सहमती दर्शवली. त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत काका पाटील यांनी भागधारक पॅनेलमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी नवनिर्वाचित संचालक नरेंद्र पाटील, अविनाश कदम, शिरीष चिटणीस, राजेंद्र चव्हाण, काका पाटील, किरण जाधव, नंदकुमार गुरव, विश्वास धुमाळ, सुनील पोळ, सौ. अंजली पवार यांच्यासह पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी, विकास धुमाळ उपस्थितीत होते.  भागधारकमधल्या सर्व दहाच्या दहा संचालकांनी एकमताने काका पाटील यांनाच चेअरमन करावे असा प्रस्ताव ठेवला. त्यास काका पाटील यांनीही मान्यता दिली. त्यानंतर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र चव्हाण यांना पुन्हा संधी द्यावी असा प्रस्ताव एकमताने पुढे आला त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी भागधारक पॅनेलतर्फे चेअरमनपदी काका पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र चव्हाण यांची नावे निश्चित केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी अध्यासी अधिकारी शिरीष कदम यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची सभा झाली. तत्पूर्वी विरोधी पॅनेलची कॉग्रेसचे जिल्हयाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, पॅनेलप्रमुख सतीश भोसले, प्रभाकर साबळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये बहुमत गमावलेले असतानाही चेअरमनपदासाठी प्रभाकर साबळे आणि व्हाईस चेअरमनपदासाठी धनश्री महाडिक यांचा अर्ज भरण्यात आला. दोन्ही जागा भागधारक पॅनेलने 10-9 अशा फरकाने जिंकल्या. चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यामुळे निकाल ऐकण्यासाठी पहिल्यांदाच फेडरेशनच्या कार्यालयाबाहेर शेकडोच्या संख्येत दोन्ही बाजूचे समर्थक उपस्थित होते. सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांनीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
शेखर चरेगावकरांना दणका
महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी काँग्रेसला साथीला घेऊन फेडरेशनवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मोठा प्रयत्न पडद्यामागून केला होता. भाजप-काँग्रेस अशी नवी युतीही त्यांनी पडद्यामागून घडवली होती. सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. सगळी शासकीय यंत्रणा पॅनेल निवडून आणण्यासाठी त्यांनी कामाला लावली होती. विरोधी पॅनेलने निवडणुकीत धनशक्तीचा वारेमाप वापर केला होता. त्यामुळे चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीतही अधिका-यांवर दबाव होता. बहुमताने संचालक नरेंद्र पाटील यांनी केलेली खुल्या मतदानाची मागणी कायद्यात तरतूद नसतानाही फेटाळून लावली. मात्र गुप्त मतदानातही शेखर चरेगावकर यांच्या डावपेचांना दणका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना व काँग्रेस अशा सर्वांनीच एकत्र येत चरेगावकरांचे डावपेच रोखले.
पारदर्शक कारभार करणार – कुलकर्णी
सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या निवडणुकीत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करण्यात आला. धनशक्तीचा वापर करुन सत्ता खेचून घेण्यासाठी सर्व विरोधकांनी प्रयत्न केले. मात्र नियतीने विरोधकांना धडा शिकवला आहे. सहकार गाडणा-यांच्या बाजूने जिल्हयातील सहकार चळवळ जाते की काय असा धोकाही निर्माण झाला होता. मात्र सर्व गणिते उलटी फिरवून पुन्हा एकदा सत्ताधा-यांच्या ताब्यात फेडरेशनचा कारभार आला आहे. पतसंस्था चळवळ विकासात्मक वाटेवर घेऊन जाण्यासाठी भागधारक पॅनेल कटीबध्द आहे. कोणतेही राजकारण न करता पतसंस्था फेडरेशनचा कारभार भागधारक पॅनेलतर्फे केला जाईल अशी ग्वाही पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी यांनी दिली आहे.
निवडीनंतर काका पाटील व राजेंद्र चव्हाण यांचे विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, राजेश पाटील-वाठारकर, आमदार आनंदराव पाटील, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमाबाब पाटणकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कराड जनता सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन विकास धुमाळ, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, भागधारक पॅनेलचे प्रचारप्रमुख जयेंद्र चव्हाण, नगरसेवक अमोल मोहिते, भालचंद्र निकम, प्रवीण पाटील, जनता सहकारी बँकेचे संचालक फिरोज पठाण, रवींद्र माने, सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, बाळासाहेब खंदारे, अनिकेत तपासे, अभय गरगटे, अन्सार आतार, राजू घोणे , आप्पासाहेब वळकुंदे, महेंद्र बाजारे, सुरेश पार्टे, नितीन मानकुमरे यांनी अभिनंदन केले.