लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकार जगवणे गरजेचे ; दर्पण पुरस्कार वितरण प्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

फलटण : बाळशास्त्रींच्या दर्पण पासून सुरु झालेला मराठी पत्रकारितेचा प्रवास विकसित होत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ0 लेखणीने कमकुवत नसला तरी इतर सुविधांबाबत कमकुवत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पत्रकाराला लेखणीचे इमान राखणे कठीण आहे. हा चौथा स्तंभ विकता कामा नये. सामाजिक व सांस्कृतिक लोकशाही टिकण्यासाठी पत्रकार जगवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले व जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय यांच्या सहकार्याने पोंभुर्ले, ता. देवगड येथील दर्पण सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पत्रकार दिन व 24 वा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण समारंभ डॉ. सबनीस यांचे हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर देवगडच्या तहसीलदार वनिता पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष बापुसाहेब जाधव, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, भारती विद्यापीठ, पुणेचे सहकार्यवाह डॉ. म. शि. सगरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ.आनंदराव पाटील, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव यांची उपस्थिती होती.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, पत्रकारांच्या मागण्यांबाबत सरकार उदासिन आहे. विविध प्रलोभने व वृत्तपत्रांची भांडवलशाही भूमिका यामध्ये आजचा पत्रकार अडकत चालला आहे. पत्रकार हा सत्याचा उपासक व कैवारी आहे. सत्य मांडताना जाती – धर्माच्या विषमतेच्या पलिकडे जावून त्याने सत्य मांडले पाहिजे. जीव मुठीत घेऊन अनेक पत्रकार काम करत असतात. शोषणव्यवस्था अशा सत्याच्या विरोधात जरी कार्यरत असली तरी सत्याच्या शोधातच पत्रकाराचे समर्पण असावे.
बाळशास्त्री हे केवळ पत्रकार नव्हते तर ते उत्तम लेखक, शिक्षक, संशोधक, भाषातज्ज्ञ ही होते. त्यांच्या विद्वत्तेचा, सामाजिकमुल्य भानाचा गौरव तत्कालिन अनेक दिग्गजांनी केला. प्रबोधनाचे जनक म्हणून त्यांचे कर्तृत्त्व समजून घेणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त करुन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने कोकणातील लालमातीत त्यांच्या जन्मगावी त्यांचे समृद्ध स्मारक उभे केले. हे स्मारक बाळशास्त्रींच्या देशव्यापी कर्तृत्त्वाला साजेसे व्हावे. संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या ङ्गदर्पणफ पुरस्कारांमुळे पत्रकारांच्या लेखणीला बळ मिळेल, असेही डॉ.सबनीस यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात रविंद्र बेडकिहाळ यांनी, बाळशास्त्रींच्या चरित्राला उजाळा देण्याचे काम पत्रकारांनी करणे गरजेचे आहे. अजूनही कर्मभूमी मुंबईत बाळशास्त्री उपेक्षित असल्याचे सांगून तेथेही त्यांचे स्मरण कार्य होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. बाळशास्त्री मुंबईतील ज्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले मराठी प्राध्यापक होते तेथील सभागृहात व ज्या सेंट्रल लायब्ररी व एशियाटिक सोसायटी मुंबई येथे अभ्यासासाठी व संशोधनपर लेखन सहभागासाठी ते बसत असत तिथेही त्यांचे तैलचित्र सन्मानाने लावले पाहिजे. याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुनही शासन याबाबत उदासिन असल्याचेही बेडकिहाळ यांनी नमूद केले. पोंभुर्ले गावाचा स्मार्ट व्हिलेज योजनेअंतर्गत  विकास होण्यासाठी योग्य तो पाठपुरावा ग्रामविकास खात्याकडे संस्थेमार्फत सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी बाळशास्त्रींची पालखी प्रमुख पाहुणे, पुरस्कारप्राप्त पत्रकार व ग्रामस्थांनी ङ्गदर्पणफ सभागृहात आणल्यानंतर प्रमुख मान्यवरांचे हस्ते बाळशास्त्रींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती असणार्‍या ङ्गदर्पणफ स्मरणिकेचे प्रकाशन डॉ.सबनीस यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर 24 व्या दर्पण पुरस्कारांचे वितरण डॉ.सबनीस यांच्या हस्ते पार पडले. त्यामध्ये जेष्ठ संपादक पुरस्कार मधुकर सामंत (संपादक, सा. बेळगाव समाचार), दर्पण पुरस्कार विदर्भ विभाग श्रीपाद अपराजित (निवासी संपादक, दै. महाराष्ट्र टाईम्स, नागपूर), मराठवाडा विभाग लक्ष्मण राऊत (जिल्हा प्रतीनिधी दै. लोकसत्ता, जालना), पश्चीम महाराष्ट्र विभाग सुभाष धुमे (संपादक सा. सर्वकाळ तुमचा सोबती, गडहिंग्लज), कोकण विभाग भालचंद्र दिवाडकर (सह संपादक दै. सागर, चिपळूण), उत्तर महाराष्ट्र विभाग रमेश पडवळ (सिनिअर कॉपी एडीटर, दै. महाराष्ट्र टाईम्स, नाशिक), विशेष पुरस्कार एम. रमजू (जेष्ठ छायाचित्रकार, सातारा), गोरख तावरे (प्रतिनिधी दै. सामना, कराड), बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुरस्कृत पत्र महर्षी वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कार देवदत्त साने (नांदेड), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील, कराड पुरस्कृत धाडसी दर्पण पुरस्कार देवेंद्र गावंडे (ब्युरो चिफ, दै.लोकसत्ता, चंद्रपूर) यांचा समावेश होता. पुरस्कारप्राप्त पत्रकारांच्यावतीने श्रीपाद अपराजीत, सुभाष धुमे, एम.रमजू, भालचंद्र दिवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते शिवाजी राऊत, पोंभुर्लेचे उपसरपंच प्रदीप फाळके, देवगड तालुका शिवसेनाप्रमुख अ‍ॅड.प्रसाद करंदीकर आदींसह देवगड तालुका पत्रकार संघ, राधानगरी तालुका पत्रकार संघ, जिंतुर तालुका प्रेस क्लब (जि.परभणी) चे पदाधिकारी व सदस्य, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, पोंभुर्ले ग्रामस्थ, जांभेकर कुटुंबीय उपस्थित होते. प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. सूत्रसंचालन अमर शेंडे यांनी तर आभार बापूसाहेब जाधव यांनी मानले.