रहिमतपूर पालिकेत मनोमिलन; नव्या सत्ता समीकरणांची नांदी ; सुनील माने, चित्रलेखा माने-कदम एकत्र निवडणूक लढविणार

रहिमतपूर : रहिमतपूर नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या चित्रलेखा माने-कदम एकत्रितपणे लढविणार असून या निमित्ताने रहिमतपूर नगरीत राजकीय घडामोडीला वेग आला असून सातारा जिल्हासह राजकीय वर्तळात भूकंप झाला आहे. या निवडणूकीच्या कालावधीत नवी सत्ता समीकरणे पाहवयास मिळतील.ही निवडणूक एकत्रित लढवावी याबाबत दोन्ही नेत्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची इच्छा होती. तशी चर्चा गेले काही दिवसांपासून रहिमतपूर व पंचक्रोशीत सुरु होती. कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देवून या नेत्यांनी एकत्र येवून रहिमतपूरच्या राजकारणाला नव्या वळवणावर नेवून ठेवले आहे. या एैतिहासिक निर्णयाचे कार्यकर्त्यांसह सामान्य नागरीकांनी मनापासून स्वागत केले असून शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना दोन्ही नेत्यांनी सांगितले की, 1853 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या एैतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या  रहिमतपूर नगरीला, नगरपालिकेला विकासाच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवण्यासाठी आम्ही एकसंघपणे कार्यरत राहणार आहोत असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकारणापेक्षा गावचा विकास महत्वाचा आहे. यानिमित्ताने रहिमतपूर नगरीतील तरुणाईला एक वेगळी दिशा मिळाली आहे.
चित्रलेखा माने-कदम म्हणाल्या की, मी गेली 15 वर्षे राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले आहे. माझ्या बरोबर असणारे कार्यकर्तेही सत्तेशिवाय एकनिष्ठ राहिले. अशा कार्यकर्त्यांना समाजकार्य करण्याची संधी मिळावी त्याचबरोबर त्यांच्या विचारांचा सन्मान व्हावा. या उद्दात हेतूने ही पक्ष विरहीत आघाडी करण्यात आली आहे.
सुनिल माने म्हणाले की, चांगल्या कामासाठी योग यावा लागतो. राजकारण असो व सत्ताकेंद्र असो हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवूनच आम्ही काम करणार आहोत. आगामी दोन दिवसांत कोणतेही मतभेद मनामध्ये न ठेवता आम्ही नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार एकत्रितपणे निर्णय घेवून ठरवणार आहोत. तसेच ही निवडणूक कोणत्या राजकीय पक्षाच्या चिन्हांवर लढवयाची की नाही याबाबतची भूमिका  एक दोन दिवसांत घेणार असल्याचेही सांगण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये अविनाश माने यांनी चित्रलेखा माने-कदम व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची आघाडी रहिमतपूरच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी ही रहिमतपूर शहराला राजकीय दृष्ट्या कलाटणी देणारी ठरेल असे स्पष्ट केले.

 

पत्रकार परिषदेस नंदकुमार माने, भानुदास भोसले, आनंदा कोरे, विद्याधर बाजारे, विक्रमसिंह माने, शशीकांत भोसले, असिफ डांगे, जयवंत माने, विनायक माने, दिलीप कदम, विजय माने, लिंबाजी सावंत, सतीश भोसले, दिलीप पवार, फिरोज मुल्ला, सचिन बेलागडे, उदयसिंह माने, शिवाजी माने, अशोक भोसले, संजय पवार, मन्सूर मुल्ला, साहेबराव माने, यशवंत लवंगारे, आप्पा मोरे, महेश भोसले, गुलाब माने, शिवदास माने यासह  कार्यकर्ते उपस्थित होते.