राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्वात मोठे राजकीय नुकसान राष्ट्रवादीमुळेच : खा. अशोकराव चव्हाण

रहिमतपूर : केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्य माणसांच्या जाण नसून सहकार क्षेत्र मुळापासून उखडून टाकण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्वात मोठे राजकीय नुकसान राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करण्यामुळेच झाले आहे. याचा सर्वात मोठा तोटा पश्‍चिम महाराष्ट्राला झाला आहे. यापुढे राज्यात होणार्‍या विधानपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायती या निवडणूका काँग्रेस स्वबळावरच लढवणार आहे.
काँग्रेस सत्तेत आल्याशिवाय सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही यासाठी जनतेने राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहवे असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. ते रहिमतपूर (ता. कोरगाव) येथे रहिमतपूर नगरपालिका राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, प्रकाश पाटील, तौफिक मुलाणी,  युवा नेते धैयशील कदम, निलेश माने, अ‍ॅड. विजयराव कणसे, भिमराव पाटील, किरण बर्गे, किशोर बाचल, संपतराव माने, जाकीर पठाण, अंकुशराव भोसले, रावसाहेब माने यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
खा. चव्हाण पुढे म्हणाले की, भाजपप्रणित राज्यांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद होणार हे अगोदर कसे समजते. सरकारच्या नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांसह, नोकरदारांची, सामान्य जनतेची अवस्था दयनीय झाली आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. काळा पैसा शोधायला हवा त्याला आमचा विरोध नाही. पण देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. रहिमतपूर नगरपरिषदेची निवडणूक प्रथमच काँग्रेस पक्षाने पक्षीय चिन्हांवर लढविली आहे. त्यामुळे हा विजयाचा एैतिहासिक संदेश मंत्रालयापर्यंत पोहचावा यासाठी जनतेने या निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेसला साथ द्यावी व पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या विजयाची नांदी पोहोचवावी.

आ. जयकुमार गोरे म्हणाले की, शासनाकडून गावच्या विकासासाठी आलेला  निधी दोन अडीच वर्षे खर्ची पडत नाही ही फार मोठी खेदाची बाब आहे. राष्ट्रवादीने विकासापेक्षा घराघरात भांडणे लावण्याचेच काम केले आहे. ज्या पक्षाचा इतिहास गद्दारीचा आहे. त्या पक्षाची सूज उतरविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मागेल ती ताकद दिली जाईल. रहिमतपूर शहरामध्ये निलेश माने यांच्या रुपाने नवे कर्तृत्ववान नेतृत्व उदयास आले आहे.यावेळी आ. आनंदराव पाटील, धैयशील कदम, अजित पाटील चिखलीकर, निलेश माने, तौफिक मुलाणी आदि मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रहिमतपूर राष्ट्रीय काँग्रेसचा  निवडणूक वचननामा प्रसिध्द करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांनी केले. सूत्रसंचालन दिपक साबळे, राजू सय्यद यांनी केले. आभार धैयशील सुपले यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ शंकर पवार, दयानंद भोसले, जितेंद्र भोसले, उमेश साळुंखे या मान्यवरांसह सर्व उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते नागरीक, महिला, युवक उपस्थित होते.