क्रूरकर्मा संतोष पोळच्या पाठीशी नक्की कोण ?

वाई : डॉ.पोळ अधिक शेफरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका बड्या अधिकार्‍याने पाठीशी घालण्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणार्‍या धोम, ता. वाई येथील सहा खून प्रकरण उघडकीस आले. आणि अनेकांना मानसिक धक्का बसला. एक विकृत व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याची यानिमित्त प्रचिती आली. गुन्हेगाराला जात नसतेतर ती प्रवृत्ती असते. ही प्रवृत्ती नाहीशी करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था प्रबळ असावा. अशी सामान्यांची अपेक्षा असते.आता अंधा कानून डोळस झाला आहे तो कायमस्वरुपी डोळस रहावा याकडे डोळसपणे बघणे गरजेचे आहे.
डॉ. संतोष पोळ याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीबाबत आता अनेकजण उलगडा करु लागले आहेत. 1975 साली धोम धरणाच्या निर्मितीने धोम येथील ग्रामस्थ विखुरले गेले. काहींनी धरणानजीक वस्ती केली. या वस्तीतच पोळ लहानाचा मोठा झाला. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय करुन नाव कमवावेअशी त्याची इच्छा असावी. पण त्याच्या कृत्याने त्यावर मात केली आहे.
डॉ. संतोष पोळ याने गेल्या काही वर्षात सातार्‍याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका बड्या अधिकार्‍याशी फारच जवळीक निर्माण झाली होती, त्या जवळीकतेच्या माध्यमातून त्याने वाईतील पोलिस अधिकार्‍यांना नाडण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या या उपद्रवामुळे पोलिसही त्याच्या नादाला लागायला धजावत नव्हते. भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणणारा डॉक्टर अशी त्याची ओळख झाली होती. त्या आधारे  भ्रष्टाचार विरोधी निर्मूलन समिती तथा दक्षता समितीवर जाण्यापर्यंत त्याने प्रयत्न केला होताअशी चर्चा वाईत सुरू होती.
डॉ.पोळ याने खुनांची कबुली दिल्यानंतर या सहा खुनाचा पर्दाफाश झाला. मंगला जेधे या अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्यअध्यक्षा असल्यामुळेच व आंदोलन झाल्याने पोलिसांना अधिक लक्ष घालावे  लागले. अशा कोल्ड ब्लडेड माणसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका बड्या अधिकार्‍याने पाठीशी घालण्याचे काम केले होते, त्यामुळेच डॉ.पोळ अधिक शेफारला अशी चर्चा आहे.
गौरीशंकर मेडीकल कॉलेजमध्ये बी.ई.एम.एस. ही डिग्री मिळवली. त्यावेळी या डिग्रीला विद्यापीठाची मान्यता होती का? याची वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच जिल्हा प्रशासनाने तपासणी केली असती तर कदाचित अनेकांच्या बोगस डिग्रीचे कारखाने बंद झाले असते. पण असे घडले नाही. सराईत गुन्हेगाराला सर्व वाटा मोकळ्या असतात. कारण त्याच्यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा त्याच्या दावणीला बांधली जाते. वाई येथील एम.डी. झालेल्या डॉ. सायगावकर यांच्या दवाखान्यात इंटरशिपचा अनुभव घेतलेल्या पोळ याने स्वत:चा दवाखाना सुरु करुन बिनडीग्रीचा डॉक्टर काय करु शकतो हे दाखवून दिले आहे. पोळ यांची डिग्री मान्यताप्राप्त नाही. हे 14 वर्षापूर्वीच उघड झाले होते. तरीसुद्धा पोळ हा डॉ. घोटावडेकरांच्या हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात रात्रपाळी करत होता. यावेळी कोणालाही त्याच्याबद्दल शंका आली नाही.
2003 साली सुरेखा चिकणे हिच्या खूनानंतर वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, सलमा शेख, नथमल भंडारी आणि मंगल जेधे अशा सहा खुनांची मालिका गेली 13 वर्षे पोळ अविरत सुरु करत होता. या भागातील बेपत्ता झालेल्या व्यक्तींबाबत त्यांच्या नातेवाईकांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण त्याची गंभीर दखल आता घेतात तशी घेतली नाही हे त्रिवार सत्य आहे. ते नाकारुन चालणार नाही.
आदरणीय निलमताई गोर्‍हे यांनी बेपत्ता तक्रारींची योग्य पद्धतीने जर तपास केला असता तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. त्यामुळे पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीला मोठा अर्थ प्राप्तझाला आहे. पोळ याने स्वत:च्या चुलतीच्या 5 गुंठे जमीनीचा करार करुन 5 एकरवर सही घेतली आहे. या व्यवहाराची चौकशी होणेही अपेक्षित आहे. पोळ याने आपल्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर वचक निर्माण करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारी करण्याचा सपाटा लावला. अनेकांचे संसार धुळीस मिळवले. राष्ट्रपतीपदक मिळवलेले पोलीस उपअधिक्षक दीपक हुंबरे हेसुद्धा त्यांच्या तावडीतून सुटले नाहीत. खरं म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक खाते हे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नावलौकिक प्राप्त केले खाते आहे. याच खात्याच्या आधारे पोळ याने आपल्याविरोधात कारवाई करणार्‍या अनेकांना बदनाम करुन सोडले आहे. आता या सर्वांच्या बदनामीची भरपाई कशी होणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
अनेक गुन्हेगारांना पाठीशी घालताना त्या गुन्हेगाराची पार्श्‍वभूमी बघण्याची फ़ारशी दखल घेतली नाही. त्यामुळे गुन्हेगार मोकाट झालेले आहेत. ते किती मोकाट झाले आहेत हे संतोष पोळने दाखवून दिले आहे. पोलीस अधिकार्‍यांवर वचक असलेला पोळ आता सर्वांसाठी घोळ ठरु लागला आहे. ज्यांच्या घरातील व्यक्तींचा खून झाला आहे त्यांची मानसिकता न जाणता तर्कवितर्क लढवून सणसणाटी पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. पोळ हा एकटा गुन्हेगार नसून त्याला वेळोवेळी पाठीशी घालणारे सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते दोषी आहेत. त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे.
वाईसारख्या सुसंस्कृत तालुक्यामध्ये एक बोगस डॉक्टर सरकारी जागेवर अतिक्रमण करुन फार्महाऊस बांधण्यापर्यंत मजल मारतो. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी फ्रँचाईसी घेतल्यासारखी तक्रारी करतो. याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. आता मात्र पोळ कसा गुन्हेगार आहे त्याची नार्को टेस्ट घ्यावी त्याला फासावर लटकावे, अशी मागणी होत आहे तर काहींनी जाहीर अभिनंदनाचे फलक लावून सक्षम पोलीस अधिकार्‍यांचा गौरव केला आहे ही समाधानाची बाब आहे.परंतु ज्यांनी चुका केल्या त्यांची नुसती चौकशी व अहवाल एवढ्यापुरते मर्यादीत न राहता त्यांनाही त्या गुन्ह्यातील सहआरोपी केल्यास पुन्हा डॉ. पोळसारखी प्रवृत्ती जन्माला येणार नाही. असे अनेकांना वाटत आहे. यार हमारी बात सुनो ऐसा इन्साफ करो, जिसने पाप ना किया है व ह पहला पत्थर मारे, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. दरम्यान पोळने केलेल्या कृत्याबद्दल त्याला फाशी होणे हे क्रमप्राप्त आहे. त्यातूनही त्याची सुटका होईल असे कुणी गैरवर्तन करु नये एवढीच माफक अपेक्षा सातारची जनता करत आहे.