मंत्रालयातून आलेल्या 3 कोटी रुपयांच्या निधी वरून पालिकेत टोकाचे राजकारण

 
सातारा : सातारा शहरातील रस्त्यांसाठी मंत्रालयातून आलेल्या 3 कोटी रुपयांच्या निधी वरून भाजप व सातारा विकास आघाडी यांच्यात टोकाचा आंतरविरोध वाढला आहे. भाजपचे सत्तेचे राजकीय पाठबळ रोखण्यासाठी सत्ताधार्‍यांनी विविध हातखंडे वापरण्यास सुरवात केली आहे. भाजपचे नगरसेवक पालिकेत येताच त्यांना लँडलाईनवरून ब्लँक कॉल देण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. मेहेरबान कोणत्या विभागात आहे तिथल्या घटनाक्रमाचा तपशील जाणून घेण्यासाठी राजकीय उचापती सुरू झाल्याने पालिकेत टोकाचे राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या तीन कोटी रुपयांचा निधी येवून 11 महिने उलटले मात्र ते सातार्‍याच्या रस्त्यांसाठी खर्ची पडले नाही. 2 कोटी 30 लाख रूपये खिशात घालून 70 लाख रुपयांची भाजपच्या तोंडाला पाने पुसण्याचा घाट साविआने घातला होता. मात्र थेट मंत्रालयातून चक्रे फिरल्याने दीड दीड कोटी रुपयांची मांडवली झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सातार्‍यात साविआच्या एका बैठकीत भाजपच्या नगरसेवकांची कामे न रोखण्याचा सूचक संदेश खासदार उदयनराजे यांनी दिला. या बैठकीला भाजपमधील उदयनराजे भक्त आणि भाजपचे गटनेतेही उपस्थित असल्याची माहिती आहे. मात्र एका बाजूने उदयनराजे यांचा सॉफ्ट कॉर्नर  भाजपच्या नगरसेवकांना मिळण्याचे संकेत असताना साविआच्या गोटात भलतेच राजकारण रंगू लागले आहे. भाजपच्या नगरसेवकावर लक्ष ठेवणे त्यांना पालिकेतील लँडलाईन वरून ब्लँक कॉल देण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी खाजगीत या प्रकरणाची तक्रार केली आहे.
काही महिन्यापूर्वी भाजपचा नगरसेवक मुख्याधिकार्‍यांच्या केबिनमध्ये असताना त्या नगरसेवकाच्या मोबाइलवर दुसर्‍या दालनातून ब्लँक कॉल आला. हॅलो हॅलो म्हणताच पलीकडून फोन बंद झाला. हा प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. एकदा तर कहर झाला त्याच नगरसेवकाला सीओंच्या केबिनमध्ये असताना  नेहमीसारखा लँक कॉल आला पुन्हा तोच प्रकार पलिकडून काहीच प्रतिसाद नाही. शेवटी नगरसेवकाने वैतागून जो कोणी असेल त्याने सीओंच्या केबिनला यावे असे मोठया आवाजात दटावून चालू मोबाइल तसाच टेबलवर ठेवून दिला. तसेच भाजपच्या  महिला नगरसेवकांचा थेट पाठलाग होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.  पाठलाग करणार्‍या दोन युवकांना एका नगरसेविकेने पकडून चांगलाच जाब विचारला होता. तेव्हा त्या युवकांची चांगलीच तंतरली होती. या होत असलेल्या प्रकाराबाबत भाजपच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र झाल्या प्रकाराबाबत प्रशासन आणि पदाधिकारी यांनी सरळ कानावर हात ठेवले आहेत. जर पाणीपुरवठा सभापती विरोधकांच्या वार्डातील लिकेजेस काढायची नाहीत अशी तंबी कर्मचार्‍यांना देत असतील तिथे पालिकेत विकास कामापेक्षा राजकीय कुलंगडया चालतात हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक टेहळणीच्या रडारवर आहेत अशा संशयाला निश्चित वाव आहे.
234077 वरून येतात ब्लँक कॉल
234076 व 234077 हे दोन क्रमांक पालिकेच्या नव्या प्रवेशद्वारावर असणार्‍या चौकशी कक्षात आहेत. 234077 हा क्रमांक महिला बाल कल्याण यांच्या कक्षात स्थलांतरित झाला आहे. आता सभापती सविता फाळके त्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे अभावानेच पालिकेत येतात. त्यामुळे हा कक्ष दिवसभर रिकामाच असतो. याच कक्षातून ब्लँक कॉल येत असल्याचा दाट संशय भाजपच्या नगरसेवकांचा आहे.  त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांवर लक्ष ठेवणारा कर्मचारी आहे की, पदाधिकारी असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याची भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आहे.