नविआचीच नव्हे तर सर्वसामान्यांनी सुचविलेली कामेही मार्गी लावणार ः सुहास राजेशिर्के ; विकासकामात राजकारण खा.श्री.छ. उदयनराजे भोसलेंना मान्य नाही

सताराः  सातारा विकास आघाडी सुरुवातीपासूनच सर्वांगीण विकासाकरिता कटिबध्द आहे. सत्तारुढ आघाडी किंवा नगराध्यक्षा विरोधकांची कामे करत नाहीत या नविआच्या आरोपात तथ्य नाही. तथापि डॉ. दाभोळकर स्मृती पुरस्काराबाबत 15 दिवसांत कार्यवाही करण्यास विलंब झाला आहे.  येत्या आठ दिवसात पूर्वी सांगितल्याप्रमाणे बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. तसेच रस्त्यांना पॅचिंग करण्याचे काम सुरु आहे. नविआने सुचवल्याप्रमाणे उद्यानात दिवाबत्ती करणे याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे संबंधित विभागांना सूचित केले आहे, असे स्पष्टीकरण सातारा नगरपालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिले आहे. विकास कामात राजकारण करायचे नाही अशा स्पष्ट सूचना खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीच दिलेल्या आहेत त्यामुळे पराचा कावळा न करता नविआने चक्री उपोषणासारखा मार्ग अवलंबू नये असे आवाहन केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पुढे नमूद केले आहे की, रस्ते पॅचिंगच्या संदर्भात ठिकठिकाणी कामे चालू आहेत. सातारा शहरात सर्वच ठिकाणी आवश्यकतेनुसार पॅचिंग करण्यात येणार आहे. पॅचिंगची सुरुवातच नविआच्या नगरसेवकांच्या वॉर्डात झाली नाही म्हणून पॅचिंगची कामे होत नाहीत असा नविआचा आरोप असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. याबाबत आपण केव्हाही माझ्यासमवेत चर्चा करावी, योग्य ती माहिती दिली जाईल, म्हणूनच पॅचिंग करताना नविआची कामे होत नाहीत या म्हणण्यात तथ्य नाही. तसेच दिवाबत्तीबाबत स्व. अभयसिंहराजे भोसले उद्यानात अत्यंत चांगल्याप्रकारची प्रकाशरचना करण्याबाबत विद्युत विभागाला सूचना दिल्या आहेत.
डॉ. दाभोळकर स्मृती पुरस्काराबाबत 15 दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते व त्यास थोडा विलंब झाला असला तरी येत्या आठ दिवसांत बैठक बोलावून योग्य तो मार्ग काढला जाईल. नजीकच्या काळात खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून कास धरण उंची वाढवण्याच्या कामाचे भूमिपूजन, पोवई नाका ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजना, न.पा. प्रशासकीय इमारत यांची भूमिपूजन होत आहे. सातारकरांच्या अत्यंत जिव्हाळयाची ही कामे मार्गी लागत असताना नागरिकांची दिशाभूल होईल असे निरर्थक प्रयत्न चक्री उपोषणाच्या माध्यमातून नविआने करु नयेत, असे आवाहन आहे. यापुढील काळात देखील सातारा शहरातील समाजहिताची कामे कोणी सुचविली आहेत हे न पाहता गरजेची विकासकामे मार्गी लावली जातील, असेही सुहासराजेशिर्के यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.