वेदांतिकाराजेंच्या रुपाने सातार्‍याला कर्तबगार नगराध्यक्ष मिळेल : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले; प्रतिसाद न मिळाल्यानेच मनोमीलन दुभंगले

सातारा :- एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासन, जिल्हा नियोजन यासह विविध योजनांच्या माध्यामातून निधी उपलब्ध करुन सातारा शहराचा विकास अखंडीत ठेवला आहे. आता नगराध्यक्षपद पाच वर्षांसाठी असून या पदावर कार्यक्षम आणि कर्तबगार महिला असावी याच उद्देशाने सर्वानुमते सौ. वेदांतिकाराजे यांना नगरविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. वेदांतिकाराजे यांच्या रुपाने स्वतंत्र विचाराचा, कार्यक्षम, कार्यतत्पर आणि कर्तबगार नगराध्यक्ष सातारा शहराला मिळणार असून सातार्‍याचा विकास झपाट्याने होईल, असे प्रतिपादन नगरविकास आघाडीचे नेते आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या निमीत्ताने संपुर्ण मराठा समाज एकत्र होताना दिसत आहे. अशावेळी गेली 10 वर्षापासून अखंडीत असलेले राजघराण्याचे मनोमीलन समोरुन प्रतिसाद न मिळाल्याने दुभंगले गेले असून मराठ्यांच्या मुख्य घराण्यातच दुफळी झाल्याचे चित्र दिसत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात महत्व असलेल्या राजघराण्यातील दुफळी टाळण्यासाठी अगदी कालपर्यंत आम्ही प्रतिसादाची वाट पहात होतो. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने आमच्या कुटुंबातील वरिष्ठ श्रीमंत छ. शिवाजीराजे आणि श्रीमंत छ. चंद्रलेखाराजे यांच्या आदेशानुसार आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून दोघांनीही आम्ही सर्व कुटूंबीय तुमच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. मी कालपर्यंत मनोमिलन होण्यासाठी सकारात्मक होतो. आता वेळ निघून गेली असून समोरुन कोणतीही चर्चा अथवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे मनोमिलन खंडीत होत असून मराठ्यांच्या अस्मितेला हानी पोहचणार असल्याची खंतही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली.
येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणावर नगरविकास आघाडीच्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. वेदांतिकाराजे भोसले, पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य रामचंद्र बल्लाळ, रामभाऊ साठे, निळकंठ पालेकर, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, जाकीर बागवान यांच्यासह अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, विद्यमान सदस्य जितेंद्र सावंत, राजू भोसले, पंचायत समितीच्या सभापती सौ. कविता चव्हाण, माजी सभापती धर्मराज घोरपडे यांच्यासह आघाडीचे सर्व जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, मी एक जबाबदार आमदार म्हणून नेहमीच सातारा शहराच्या विकासासाठी प्रयत्न केला असून यापुढेही प्रयत्न करत राहणार आहे. सौ. वेदांतिकाराजे यांनी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवले आहेत. त्यांनी पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. आमच्या कुटूंबात त्यांना नेहमीच निर्णय स्वातंत्र्य दिले गेले असून मी कधीही त्यांच्या कोणत्याही कामकाजात हस्तक्षेप केला नाही. त्यांची कर्तबगारी आणि कार्यक्षमता ओळखूनच आमच्या कुटूंबातील वरिष्ठांनी सौ. वेदांतिकाराजे यांना नगराध्यक्षपदी विराजमान करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा सातारा शहराला होईल हाच एकमेव उद्देश त्यापाठीमागे  आहे. निवडणूकीत विरोधकांकडून आरोप होणार. त्यांच्याकडे तेवढेच काम असते. आता ते घराणेशाहीचा आरोप करतील. गेली 40 वर्ष आमच्या घरात सत्ता आहे. मात्र, आमच्या कर्तुत्वामुळे जनतेने आम्हाला सत्तेवर ठेवले आहे. एखाद्या आमदाराची पत्नी कर्तबगार, कर्तुत्ववान असेल तर तिच्या कर्तबगारीचा फायदा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला झाला पाहिजे. डॉक्टरची पत्नी डॉक्टर झाली तर काय बिघणार आहे. त्यामुळेच सौ. वेदांतिकाराजे यांचे नाव निश्‍चित नसतानाही केवळ तीन दिवसांपुर्वी सर्वांशी विचारविनिमय करुनच त्यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्‍चित करण्यात आल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. विरोधकांना आरोप आणि टिका करण्याशिवाय दुसरे कामच नसते. पालिकेच्या सत्तेत आमच्याबरोबर काम करणारेच काही नगरसेवक आता टिका करत आहेत. सातार्‍यात काहीही झाले नाही अशी ओरड करणारे हे लोक सत्तेसाठी काहीही करतील. आम्हला सत्ता मिळाली तरच तुमचे काम करु, असे ब्लॅकमेलींग या लोकांकडून सुरु असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
स्व. भाऊसाहेब महाराज यांनी कार्यकर्ते आणि जनतेच्या साथीने सातारा शहर आणि तालुक्याचा कायापालट केला. त्यांच्या पश्‍चात मी आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी तुम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहिलात. सध्याची पालिकेची निवडणूक तितकीशी सोपी समजू नका. फर्स्ट इंम्प्रेशन इज लास्ट इंम्प्रेशन याप्रमाणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली ताकद दाखवून देवूया. वेदांतिकाराजे नगराध्यक्ष झाल्यास स्वतंत्रपणे विचार करुन विविध जनकल्याणकारी योजना त्या निश्‍चितपणे राबवतील. प्रशासनाला एक चालना मिळून समाजाभिमूख कारभार आपल्याला पहायला मिळेल. आपल्याला सातार्‍याला सिंगापूर अथवा शांघाय करायचे नाही तर, स्वच्छ, सुंदर सातारा करायचा आहे आणि हे फक्त सौ. वेदांतिकाराजे यांच्या माध्यमातूनच होवू शकणार आहे. यासाठी सौ. वेदांतिकाराजे यांच्यासह नगरविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडणून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केल्या.
अ‍ॅड. दिलावर शेख म्हणाले, तमाम मुस्लीम समाज स्व. भाऊसाहेब महाराजांपासून या घराण्याच्या पाठीशी आहे. या घराण्यात हुकुमशाही नाही तर, लोकशाही, प्रेम आणि आपुलकी आहे. कोणालाही भेटण्यासाठी दडपण वाटत नाही. त्यामुळेच सर्व मुस्लीम बांधव नेहमीप्रमाणे या निवडणूकीतही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून सौ. वेदांतिकाराजे यांच्यामुळे पालिका प्रशासन जोमाने कार्य करेल, असा विश्‍वास अ‍ॅड. शेख यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांनी मनोगत व्यक्त केले.
पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी प्रास्ताविक केले. माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांनी आभार मानले. बैठकीला पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व सदस्य नविआचे पदाधिकारी, सर्व आजी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज उमेदवारी अर्ज दाखल करणार…………

 

दरम्यान, शनिवार दि. 29 रोजी सौ. वेदांतिकाराजे यांच्यासह नगर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. सुरुची बंगला येथे सकाळी 9.30 वाजता सर्व कार्यकर्ते जमणार असून नगरपालिकेपर्यंत पदयात्रा काढूण अर्ज दाखल केले जाणार आहेत. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार असून सातारा शहरासह तालुक्यातून हजारो कार्यकर्ते आणि बाबाराजे समर्थक सहभागी होणार आहेत.