पालिकेच्या सभेत रंगणार विकासावर धुमशान

सातारा :  दि. 16 रोजी पालिकेत होणार्‍या सर्वसाधारण सभेत विविध कामांच्या दरमंजुरीसह विकासाच्या मुद्द्यांवर वादळीचर्चा होण्याची चिन्हे निर्माण झाली असून विरोधकांनी मुख्याधिकारी आणि सत्ताधार्‍यांवर केलेल्या आरोपांचे धमासान सभेत रंगणार आहे. बहुतांश विषय पूर्ण नसल्याने सभा तहकूब करण्याची मागणी करण्यात आली असून चुकीचे प्रोसेडींग आणि वाढीव निविदा हा कळीचा मुद्दा उपस्थित झाला असताना आरोग्याच्या देयकांची जंत्री रेकॉर्डवर येणार असल्याने आजची सभा वादळी ठरणार आहे.
सातारा पालिकेत मनोमिलन संपल्यानंतर प्रत्येक सर्वसाधारण सभा कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजली आहे. आजही आयोजित सभेत 27 विषय घेण्यात आले असून यापैकी बहुतांश विषय प्रलंबित कामांच्या दर मंजुरीचे आहेत. तर कासच्या पाईप लाईनवर तीन ठिकाणी कनेक्शन देण्याचा घाट घातला आहे. शहरात पाण्याची टंचाई असताना थकबाकीदारांचे चोचले कशासाठी पुरवले जातात? हा सवाल असताना अमृत अंतर्गत मलनिसारण प्रक्रिया राबवली जात असून संबंधित मक्तेदाराला पोसण्याचा ठराव मांडण्यात आल्यामुळे पालिकेत नेमके काय सुरु आहे असा प्रश्न विरोधी पक्षातील सदस्यांनी केला आहे. सभेचा अजेंडा मिळाला असला तरी विषयांच्या टिप्पण्या तयार नसून अध्यक्षांच्या स्वाक्षर्‍या झालेल्या नाहीत. त्यामुळे ही सभा तहकूब करावी, अशी मागणी विरोधी पक्षाने मुख्याधिकारी गोरे यांच्याकडे केली आहे. अशातच मागील सभेच्या वृतांतात 41 सदस्य मतदानाला हजर असल्याचा गंभीर प्रकार नमूद केल्यामुळे जे सदस्य मागील सभेला उपस्थित नव्हते, त्यांना हजर कसे दाखवले हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. एकंदरीत सभेचे इतिवृतांत कोणत्या मविकृतीफच्या सांगण्यावरून प्रशासन तयार करते, याचा उलगडा मुख्याधिकारी गोरेंना द्यावा लागणार आहे. अशातच अध्यक्षांना डावलून आरोग्य विभागातील बिले काढली असल्याचा आरोप करत मुख्याधिकारी गोरेंवर विरोधकांनी तोंडसुख घेतले असले तरी अव्वाच्यासव्वा दराने आलेली बिले हा सभेत मुख्य मुद्दा राहणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या आडून पालिकेला ओरबडण्याचे काम करणार्‍या ठेकेदारांना पोसणारे चेहरे बिलांच्या आकडेवारीवरून उघड होणार असल्याने या सभेत अधिकार्‍यांची झाडाझडती निश्चित असली तरी सत्ताधारी साविआला नविआ आणि भाजपा सदस्य टार्गेट करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्य विभागाची बिले, घंटा गाडीचा गोंधळ आणि सर्वेक्षणातून फोफावलेली चिरीमिरी हे मुद्दे असताना मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर आगपाखड होणार असली तरी नुकतीच झालेली नगराध्यक्षांची परदेशवारी आणि सातारकरांची गैरसोय यावरही सभेत खल होणार आहे.