सातारा एस. टी. आगारातच खाजगी सावकारीचा अड्डा ; कर्मचारी सावकारीच्या पाशात

सातारा (शरद काटकर): पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी सातारा शहरासह जिल्ह्यातील खाजगी सावकारांच्या मुसक्या आवळ्या असल्यातरी सातारा एस. टी. आगारात मात्र सेवानिवृत्ती कर्मचार्‍यांनी खाजगी सावकारीचा धुडगूस घातला आहे. त्यामुळे सातारा आगार हे सावकारीचा अड्डा बनले असून महिन्याला कोटीच्या घरात उलाढाल असल्याची चर्चा आहे. सावकरीच्या दहशतीने कर्मचारी देशोधडीला लागला तरी तक्रार देण्यास कोणीही धजावले नाही. बँकेच्या कर्मचार्‍यांशी खाजगी सावकारांचे साटेलोटे असून महिन्याला 70 ते 80 लाखापेक्षा अधिक रकमेची खाजगी सावकारीची उलाढाल होत आहे. त्यामध्ये एखादा कर्मचारी खाजगी सावकारीच्या पाशात अडकून अडकला जावून तो आत्महत्या करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  जिल्हा पोलीस अधिक्षस संदिप पाटील यांनीच आता एस.टी आगारातील सावकारीचा बिमोड करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात खाजगी सावकारी प्रकरणी पोलीसांनी धकड मोहिमच सुरू केली आहे. तडीपारपासून ते मोक्का लावून अशा टोळ्यांंचा बिमोड करण्याचा सपाटा लावला असला आहे. कराड, सातारा येथील सुमारे 15 ते 20 गुंडाना गुडघ्यावर आणल्याने खाजगी सावकारी जगतात भितीचे वातावरण आहे. या टोळ्यांच्या दहशतीने अनेक कुटूंबे भयमुक्त झाली आहेत. हे जरी खरे असले तरी गुंडाच्या दहशतीने तक्रारीचा ओघ अपेक्षीत नाही. पोलीसांनी वारंवार आवाहन करून देखील जनतेतून प्रतिसाद मिळत नाही. खाजगी सावकारीला कंटाळून एका सेवानिवृत्त जवानांचे कुटूंबियांसह पलायन केल्याने अखेर पोलीसांनी या प्रकरणात टोळ्यांना मोका लावला तर काही गुंडाना हद्दपारीचे आदेश काढून खाजगी सावकारीचा बिमोड करण्याचा निश्‍चय केला आहे.बडा घर पोकळ वसा अशा पध्दतीने एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांची अवस्था आहे. कामाला महामंडळात पण वेट बिगारापेक्षा कमी धनात काम करणारे कर्जात बुडाले आहेत. चार ते पाच हजारात चालक, वाहक राब राब राबत आहेत. एवढ्या तुटपूंज्या पगारात संसाराचा गाढा ओढणे अवघड झाले आहे. वाढत्या महागाईबरोबरच मुलांच्या खर्चात वाहक-चालक पिचलेल्याचा फायदा खाजगी सावकारांनी उचलला आहे.विशेष म्हणजे महामंडळातील काही सेवानिवृत्त कर्मचारी असलेली ही सात जणांची टोळी असून ते 7 ते 10 टक्याने व्याजाने पैसे देतआहेत. दरमहा व्याज वसुल करून मुद्दल कर्जदाराच्या मानगुटीवर ठेवत आहेत. विशेष म्हणजे एखाद्या कर्मचार्‍यांने पैसे देण्याची टाळाटाळ केलीतर त्याला आगाराच्या आवारातच अनोळखी गुंड येवून बेदम मारहाण करीत असल्याची एक घटना घडल्याची चर्चा आहे. अशा दहशतीने कर्मचारी पत्नीचे दाग दागीने प्रसंगी विकून व्याजाचा हप्ता भागवत असले तरी या सावकारांना दयेचा पाझर फुटत नाही.प्रापंचिक अडचणीत असलेल्या कर्मचार्‍याला सावकारांचे एजंट बरोबर हेरतात. त्याला एस. टी. कर्मचारी बँकेचा रस्ता दाखवतात त्या ठिकाणी देखील सावकारांनी आपले मजबूत पाय रोवल्याचे वृत्त आहे. कोणत्या कर्मचार्‍यांचे किती कर्ज आहे. त्याचे किती हप्ते थकले आहेत. कर्जफेड किती झाली अशा कर्मचार्‍यांस किती कर्ज मिळू शकते याची इंतूभुत माहिती सावकारांना कळते. एखाद्या कर्मचार्‍यांचे खाजगी सावकारांचे कर्ज परतफेड करायची असेल तर त्याला जादा कर्ज मिळवून देण्याची हमी घेतली जाते. यामध्ये काही अर्थपूर्ण संबध जोडले जातात. या कर्मचार्‍यांचे एटीएम कार्ड सावकार घेतात खात्यावर झालेल्या रकमेऐवजी सावकारीची वसुली होते. पुन्हा कार्ड कर्मचार्‍याच्या स्वाधीन केले जाते. सावकारांची वसुली होते मात्र कर्मचारी भिकेला लागतो. हे करून देण्याचा मोबदल्यात बँक कर्मचार्‍याना दोन्ही बाजुनी मलिदा मिळतो. तसेच कर्जदारांकडून सावकरांचे पैसे वसुल झाले म्हणून सावकारांकडून बक्षिस मिळत असल्याची चर्चा आहे. काही वेळा हे सावकार मदिरेपासून ते मटणापर्यंतचा खर्च कर्जदारावर लादत असल्याचे बोलले जात आहे.
सावकरांकडून 40 हजाराचे घेतलेले कर्ज एक कर्मचारी सलग 10 वर्षे कर्जफेड करीत होता. नुसत्या व्याजाची वसुली केली जात असल्याने मद्दल कायम डोक्यावर रहायची. या कर्मचार्‍यांचे अचानक निधन झाले. खाजगी सावकार त्याच्या कुटूंबियापर्यंत पोहचले. त्या कर्मचार्‍याच्या कुटूंबियांना धिर देवून सात्वंन केले. थकीत व्याजाची रक्कम नको पण मुद्दल तरी द्या, अशी मध्यस्थी मागणी पुन्हा झाली. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच सावकारांनी यु टर्न घेवून जाऊ देत आमचाच माणूस होता. अशी सहानुभूती दाखवून कर्ज माफी दिली खरी परंतु दहा वर्षात व्याजाने कर्जाच्या रकमेच्या तीनपट रक्कम वसुल केल्याची दबक्या आवाजातील चर्चा आहे. महामंडळाचे अकाऊंट, एस. टी. पार्सल कार्यालय परीसर कर्मचारी बँक कार्यालय या तीन जागांवर खाजगी सावकार आणि गुंडाचा खुले आम राबता असल्याची कुजबूज आहे.
महामंडळाच्या एखाद्या कर्मचार्‍याला मुक्कामाचे ठिकाणी 200 ते 500 रूपयांची गरज लागली तरी ती सावकार भागवताना दिलेल्या रकमेतून पहिली व्याजाची वसुली करूनच उर्वरीत रक्कम कर्मचार्‍यांच्या हातात ठेवतात. या जाळ्यात एकदाचा कर्मचारी गुंतला की, तो भिकेलाच लागतो. गुंडाच्या दहशतीने काही कर्मचारी कामावर वरचेवर दांड्या मारत आहेत. एका कर्मचार्‍याने कर्जफेडीसाठी पत्नीचे मनीमंगळसुत्र विक्रीसाठी आणल्याचे लक्षात येताच सावकारांनी जेवढी मिळाली तेवढी व्याजाची रक्कम घेतली. उर्वरीत व्याज मुद्दलमध्ये टाकले. त्या कर्मचार्‍याचे डोक्यावरून हात फिरवत असू देत तुझ घर सुध्दा चालल पाहिजे. जमतील तशी व्याजाची रक्कम दे ! उगाच मंगळसूत्र विकू नको, असा खोटा कळवळा आणल्याची दबक्या आवाजात आगारात चर्चा आहे. महिन्याला 70 ते 80 लाखापेक्षा अधिक रकमेची खाजगी सावकारीची उलाढाल असून त्यामध्ये एखाद्या कर्मचार्‍याचा बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीसांनी खाजगी सावकारी विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. कर्मचार्‍यांनी धाडसाने पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावल्यास सावकारीचा बिमोड होईल. परंतु दहशतीने कोण धाडस करील असे वाटत नाही. त्यामुळे खाजगी सावकारीच्या पाशातून मुक्ततेसाठी कर्मचारी पगारवाढ हा एकमेव पर्याय आहे.