मंगळवार तळ्याचा सगळा हिशोब चुकता होणार : खा. उदयनराजे भोसले यांचा घणाघात

सातारा : प्रभाग क्र. 18 मधील पडद्यामागील ठेकेदारांना खड्यासारखे बाजुला करा व सातारा विकास आघाडीचे उमेदवार वसंत लेवे व सुनिता पवार यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी या प्रभागातील साविआच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या कोपरा सभेत केले आहे.
यावेळी साविआच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ माधवी कदम, प्रभगातील उमेदवार वंसत लेवे, सुनिता पवार, सचिन दिक्षीत, संतोष गायकवाड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सातारा विकास आघाडीने खा.उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचार सभांना शहरात मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. काल दि. 17 रोजी  प्रभाग क्र. 18 मधील कारंडबी नाका येथे कोपरा सभा आयोजित केली होती. खा. उदयनराजे मार्गदर्शनासाठी आले होते. त्यांच्या भाषणात पुढे बोलताना म्हणाले की,  नगर विकास आघाडीने शहरात भ्रष्टाचार केला यामुळे आम्ही त्यांच्याशी युती तोडली अशा भ्रष्टाचारी लोकांना व पडद्यामागील ठेकेदारांना खड्यासारखे बाजुला केले पाहिजे.  मंगळवार तळ्यावर कुणी किती आणि कसे राजकारण केले हे समस्त सातारकरांना ठाऊक आहे. पोस्ट ऑफिस तळ्यावर आणण्याची स्वप्ने दाखवून स्वत:ची तुंबडी भरण्याचे उद्योग ज्यांनी केले त्यांना जनता माफ करणार नाही, सगळा हिशोब आत्ताच चुकताच होणार आहे. यावेळी प्रभागातील असंख्य नागरिक  उपस्थित होते.