नांगरे-पाटीलांची चार जिल्ह्यात जहागिरी : सुरेश खोपडे

सातारा : विश्‍वास नांगरे-पाटील हे आयपीएस लॉबीचे भाग बनले आहेत. त्यांना त्या प्रवाहात राहायचे आहे. अन्यथा त्यांचा खोपडे होईल. नांगरे-पाटीलांची जहागिरी चार जिल्ह्यात आहे. लाखो एकर जमीन आहे, त्या जागेवर अशोक स्तंभ त्यांनी लावावा, अशी टीका निवृत्त आयपीएस सुरेश खोपडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
शांतीदूत पाडला हे चुकीचे आहे. शांतीदूत हलविल्यानंतर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळेच मी या विरोधात भूमिका घेतली आहे, असे सांगून सुरेश खोपडे म्हणाले, येथील जनतेला परिवर्तन हवे आहे. कुठले ही शहर व समाज सुरक्षित, समृध्द, निरोगी, आणि आनंदी बनला पाहिजे. शांतीदूत पाडून त्यांना परिवर्तन पाडायचे होते. परिवर्तनाचा विचार दाबून टाकायचा होता. माझ्या नावाचा काहीही संबंध नाही.
पालकमंत्र्यांची गाडी मुख्यालयात जाताना अडथळा येतो म्हणून शांतीदूत काढून टाकला आहे, असे सांगितले जाते यावर श्री. खोपडे म्हणाले, मुळात माणसाने एक चूक केली की ती लपविण्यासाठी तो दहा चुका करतो. त्याप्रमाणे या सर्वांचे चालले आहे. पालकमंत्र्यांच्या गाडीला महामार्गावर अपघात झाला म्हणून पालकमंत्री महामार्गच उखडून टाका आणि गावावरून रस्ता करा, असे होऊ शकत नाही.
या शांतीदूताच्या जागी अशोक स्तंभ उभारण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे, या प्रश्‍नावर श्री. खोपडे म्हणाले, मुळात नांगरे पाटलांची जहागिरी चार जिल्ह्यात आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्याच्या समावेश आहे. तिथे तो लावावा. लवकरच पारधी आणि आदिवासी समाजाला घेऊन आंदोलनाबाबतची भुमिका घेतली जाईल आणि हे आंदोलन शांततेत असेल.
तो ऐकत नाही तर एनकॉऊंटर करण्याची परवानगी द्या, असे एक आयपीएस अधिकारी म्हणाला होता. पोलिस अधिकार्‍यांना बदल दाबायचा असतो. ते कुठल्या परिस्थितीला जाऊन बदल दाबतात. त्यातूनच हे कबूतर संपविलेले आहे. ही तर साधी गोष्ट आहे. मात्र, तुम्ही डॉ. दाभोळकर, पानसरे पाहिले असतील, या लोकांनाही हे अशाच पध्दतीने दाबण्याचा प्रयत्न करत असतात, असेही खोपडेही म्हणाले.