सुरूची राडा प्रकरणातील चार आजी-माजी नगरसेवकांसह 60 जण हद्दपार ; सातारा तालुक्यातील 173 जणांचा हद्दपारीत समावेश

सातारा : गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमिवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाने सुरूचीवरील धुमश्‍चक्रीप्रकरणातील चार आजी-माजी नगरसेवकांसह 60 जणांना तसेच सातारा तालुक्यातील एकूण 173 संशयितांना गणेशोसत्व होईपर्यंत सातारा तालुक्यातून हद्दपार केले आहे.
नगरसेवक अमोल मोहिते, अतुल चव्हाण, किशोर शिंदे, माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, बाळासाहेब ढेकणे, बाजार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विक्रम पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.
या सर्वांना सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सातारा तालुका सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 52, तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 24, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील 92 तर बोरगाव पोलिस ठाण्यांतर्गत पाच संशयितांचा यामध्ये समावेश आहे.
सुरूची धुमश्‍चक्री प्रकरणातील काहींना चार दिवसांसाठी तर बहुतांश संशयितांना दोन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. सातारा शहर व तालुक्यातील इतर गुन्ह्यांतील संशयितांना सात दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या सर्वांची हद्दपारीची मुदत दि. 24 रोजी सकाळी दहा वाजता संपणार आहे.