नुकसान भरपाईसाठी टाहो फोडत शेतकर्‍यांचा वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना घेराव 

पाटण: पाटणपासूनच जवळच असलेल्या काळोली येथे शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने लागलेल्या आगीत सुमारे 100 ते 150 एकर जमिनीतील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेकडो शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना दिल्यानंतर कंपनीचे सहाय्यक अभियंता कांबळे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखील संपूर्ण उसाचे क्षेत्रच नेस्तनाभूत झाल्याने आक्रमक झालेल्या शेकडो शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईसाठी टाहो फोडत वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना घेराव घालून जाब विचारला. यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, पाटणपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील काळोली गावच्या हद्दीतील कोयना नदीकाठावरील असणार्‍या काळवट, इंगळ्याचा माळ, देऊळमाती या शिवारातातील तोडणीला आलेल्या उसाला गुरूवार दि. 22 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागली. या आगीमध्ये सुमारे 100 ते 150 एकर क्षेत्रावरील उसाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे. यात शेकडो शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच पाटण तालुका खरेदी विक्री संघाचा अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आग विझविण्यात अनेक अडचणी येत होत्या. आग अटोक्यात आणण्यासाठी गावातील सर्व तरूण कार्यकर्त्यांबरोबरच महिलांनी सहभाग घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात येत असल्याने आगीजवळ जाणे अशक्य होत होते.
आगीची माहिती शेतकरी धनाजी पवार, विठ्ठल पवार यांनी भ्रमण दूरध्वनीवरून पाटण येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी सहाय्यक कनिष्ठ अभियंता प्रशांत कांबळे यांना दिल्यानंतर ते आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र उपस्थित सर्व शेतकर्‍यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. तोडणीला आलेला ऊस शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत जळत असल्याचे पाहून अनेक शेतकर्‍यांना अश्रू अनावर झाले होते. शॉर्ट सर्कीटने ऊस जळून गेल्याने उपस्थित शेकडो शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईची तात्काळ मदत मिळावी अन्यथा येथून हलणार नाही असा एकच ठेका धरत वीज वितरण कंपनीचे अधिकारी प्रशांत कांबळे यांना घेराव घातल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच वाढीव पोलीस बंदोबस्त मागवून गर्दीवर नियंत्रण  ठेवण्यात आले.
काही वेळातच युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर व पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांनी घटनास्थळी भेट देवून नुकसानीची पाहणी करून शेतकर्‍यांचे सांत्वन केले. सत्यजितसिंह पाटणकर यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने जळीतग्रस्तांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशा सूचना केल्या. तसेच तहसीलदार रामहरी भोसले यांनी देखील आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना बाधित शेतकर्‍यांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. मात्र तरीही शेतकरी ऐकण्याच्या तयारीत नव्हते. सत्यजितसिंह पाटणकर यांनी शेतकर्‍यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
या आगीमध्ये शंकर सीताराम पवार, शंकर खाशाबा पवार, शंकर लक्ष्मण पवार, बबन लक्ष्मण पवार, दीपक हणमंत पवार, तुकाराम मधुकर पवार, बाबासो पवार, संभाजी रामचंद्र पवार, शिवाजी रामचंद्र पवार, वसंत बंडू पवार, दत्तात्रय आनंदा पवार, जगन्नाथ रामचंद्र पवार, गोपाळ किसन पवार, गोविंद किसन पवार, विजय तुकाराम पवार, सुरेश दगडू पवार, सुरेश हणमंत पवार, दगडू कृष्ण पवार, राहूल गणपत पवार, दत्तात्रय यशवंत पवार, एकनाथ यशवंत पवार, विठ्ठल धोंडीबा पवार, पांडूरंग धोंडीबा पवार, ज्ञानदेव लक्ष्मण पवार, संपत ज्ञानू पवार, गणपत ज्ञानू पवार, दिनकर मारूती पवार, संतोष सखाराम पवार, प्रदीप विष्णू पवार, ज्ञानदेव नथु पवार, विष्णू नीनू पवार, प्रदीप विष्णू पवार, आनंदा नीनू पवार यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे नुकसानीची निश्‍चित आकडेवारी मिळू शकली नाही.