खा. श्री. छ. उदयनराजे यांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला

सातारा : राष्ट्रवादी सुप्रिमो खा. शरद पवार आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सातारा दौर्‍यावर आहेत. शरद पवारांचा दौरा म्हटल्यानंतर राष्ट्रवादी जनांची राजकीय उजळणी असते. कोणत्या मतदारसंघात काय चाललेय, याचा कानोसा घेतल्याशिवाय खा. शरद पवार सातारा जिल्ह्यातून बारामतीकडे जात नाहीत. असे असताना आज सकाळी खा. शरद पवारांची खा. श्री. छ. उदयनराजेंनी शासकीय विश्रामगृहात भेट घेतली व पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. शेवटी राष्ट्रवादीच्या टोळक्यातून बाहेर पडल्यानंतर खा. उदयनराजे यांनी मिष्किलीने दगा दिला तर याद राखाफ, असा अप्रत्यक्ष टोला लगावला.
खा. शरद पवार सुमारे दोन महिन्यांनंतर सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी व जयंतीला ते न चुकता हजेरी लावतात. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे. यानिमित्त खा. पवार आज सातार्‍यात आले. सातार्‍यातील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी झाडून उपस्थित होते. यामध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी विश्रामगृहाच्या पोर्चमध्ये हातात बुके घेवून उभे होते, तर बाजुलाच खा. उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करीत होते. दरम्यान, साडेअकरा वाजता सातारा विश्रामगृहात खा. पवारांची गाडी दाखल झाली. यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांसह पदाधिकार्‍यांनी खा. पवार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर खा. उदयनराजेंनी पवारांशी हस्तांदोलन करीत बुके देवून सातारा जिल्ह्यात आपले स्वागत आहे, असे उद्गार काढले. त्यानंतर खा. पवार विश्रामगृहातील कक्षात गेल्यानंतर मागोमाग राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारीही आत गेले. खा. उदयनराजेही सर्वांच्या पाठिमागून आतील कक्षात पोहोचले. सुमारे एक मिनिटभर खा. पवारांबरोबर थांबल्यानंतर ते विश्रामगृहातून बाहेर पडले. पोर्चमध्ये खा. पवारांची कार उभी होती. पवारांच्या गाडीला चालक असलेला गामा यांच्याशी आपल्या खास शैलीत हास्यविनोद केल्यानंतर ते त्यांच्या कारमध्ये बसले. दरम्यान, पत्रकारांनी नेहमीप्रमाणे खा. उदयनराजेंना छेडले असता उदयनराजेंनीही दिलखुलासपणे बैठकीबाबत काहीच घडले नसल्याचे सांगितले. शरद पवार राजकारणातील मोठे व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार? फसवाफसवी करु नका, नाहीतर मी आहेच, असा अप्रत्यक्षपणे टोला शरद पवारांचे नाव न घेता उदयनराजेंनी लगावला.