उदयनराजेंच्या कोंडीला आता ऑडीटोरियमचे निमित्त

खा. उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीला जवळपास सात वर्ष पूर्ण होत आली आहेत. मात्र उदयनराजे व राष्ट्रवादी यांचे मधूर संबंध म्हणजे तुझे माझे पटेना, तुझ्या वाचून करमेना असेच आहेत. राष्ट्रवादीशी नेहमीच फटकून वागणार्‍या उदयनराजेंना जिल्हा राष्ट्रवादीने अविश्‍वास ठरावाच्या नाट्यानंतर पुन्हा कॉर्नर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ज्या अविश्‍वास ठरावाने राष्ट्रवादीच्या तंबूत अंतर्गत संशयाची आग लावली त्या आगीत राष्ट्रवादीचे नेतेही होरपळले मात्र यामधून त्यांनी कोणताच बोध घेतल्याचे दिसत नाही. खरे तर अविश्‍वास ठरावाचा मोठा प्रयोग उदयनराजे समर्थक जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष रवि साळुंखे यांच्यावरच होणार होता. मात्र उगाच राजकीय तणतण नको म्हणून माण तालुक्यातुन शिवाजी शिंदे यांचा पर्याय शोधण्यात आला. मात्र शिंदे यांनीच राष्ट्रवादीच्या या प्रयत्नांना मुळासकट सुरुंग लावल्याने आणि त्याला काँग्रेससह उदयनराजे समर्थकांनी साथ दिल्याने राष्ट्रवादी व उदयनराजे गटातील कटूता अधिकच तिखट झाली आहे. जिल्हा परिषदेतल्या सत्ता बदलाला अद्याप सहा महिने बाकी आहेत. मात्र, राष्ट्रवादीतलेच पण विरोधात काम करणारे पदाधिकारी पक्षश्रेष्ठींना सलू लागल्याने त्यांना राजकीय अडगळीत टाकण्याचे प्रयत्न पुन्हा नव्याने सुरु झाले आहेत. पंधरवड्यापूर्वी येथील पुष्कर मंगल कार्यालयात सातारा तालुक्यातील राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यात उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. व्यासपिठावरील बॅनरवर उदयनराजे भोसले यांचा फोटोच नसल्याने राजे समर्थकांचे अस्वस्थता आणखीनच वाढली. या सगळ्या कोंडी करण्याच्या हालचाली उदयनराजे यांच्या लक्षात येत होत्या. मात्र त्यांनी ब्र उच्चारला नाही. पण अविश्‍वास ठरावाच्या नाट्यात शिवाजी शिंदे यांना ताकद देवून उदयनराजेंनी राष्ट्रवादीला अप्रत्यक्षरित्या गुडघ्यावर आणले. नागठाने गटाच्या पोटनिवडणूकीतही राष्ट्रवादीने उदयनराजे गटापासून चार हात लांब राहणे पसंत केले. आमदार शिवेंद्रराजे यांनी या सार्‍याच घडामोडींवर चकार शब्द काढला नाही. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी असल्याने पक्ष आणि बंधू प्रेम अशी राजकीय कसरत होत असल्याने राजेंच्या मनातही अंतस्थ खदखद आहे. त्यामुळेच सातारा शहरातीलही मनोमिलन मतभेदांचे राजकीय हेलकावे खात आहे. अविश्‍वास ठरावाचा पहिला अंक संपवल्यानंतर राष्ट्रवादीने आता कै. यशवंतराव चव्हाण  ऑडिटोरियमचे निमित्त काढले आहे. या ऑडिटोरियमला जेव्हा राज्यशासन व जिल्हा नियोजन मंडळाकडून येणारा निधी कमी पडला तेव्हा अजितदादा पवार यांच्या समन्वयातून जिल्हापरिषद उपाध्यक्ष रवि साळुंखे यांनी सेस फंडातून चार कोटी रुपये निधी उपलब्ध केला. जिल्हा परिषदेच्या कारभारात साळुंखे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त हाती घेण्यात आलेल्या ऑडिटोरियमचे काम यंत्रणेला हाताशी धरुन जाणिवपूर्वक करुन घेतले. आता ही भव्य वास्तू अनेक राजकीय अडथळ्यानंतर येत्या 18 सप्टेंबरला राष्ट्रवादी सुप्रिमो माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वास्तविक बजट 10 कोटी रुपयांचे असताना जादा निधीला मंजूरी मिळेल या अपेक्षेने ते वाढवण्यात आले. मात्र जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीला शासनानेच कात्री लावल्याने राष्ट्रवादीची चांगलीच गोची झाली. त्यावेळी राजे समर्थक साळुंखे यांनी ऑडिटोरियमचे काम पुर्ण करण्याचा आटापीटा केला. मात्र राष्ट्रवादी विरुध्द पदाधिकारी या निमित्ताने उभी भांडणे सुरु झाल्याने रवि साळुंखे राष्ट्रवादीच्या गुडबुकमधून बाहेर गेले आहेत. या वास्तूच्या उद्घाटनासाठी उदयनराजेंसह त्यांच्या समर्थकांना डावलण्याचा राजकीय स्टंट सुरु झाला आहे. गेल्या दोन महिन्यात राजेंना डावलण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. बेरजेचे राजकारण करुन स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणूकांना सामोरे जाणे गरजेचे असताना राष्ट्रवादीची वाद ओढवून घेण्याची खुमखुमी गेली नाही. याचे परिणाम आगामी निवडणूकीत उमटल्याशिवाय राहणार नाही.