मागण्या मान्य न झाल्यास वाघेश्‍वर ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा

मसूर: वाघेश्‍वर येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसा पूर्वी आपल्या मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी सातारा यांना मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देवूनही याबाबत कोणतीही हलचाल झाली नाही .यामुळे गावातील नागरीकांनी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह परिसरातील वाघेश्‍वर,चिंचणी,पिंपरी,कवठे व धनकवडी या पुर्नवसित गावांतील ग्रामस्थांची बैठक वाघेश्‍वर येथे संपन्न झाली.
यावेळी शंकर चव्हाण म्हणाले गेली 40 वर्षे झाली तरी आमच्या गावाची नोंद सिटीसर्वेमध्ये नाही,गाव महसुल विभागाकडे नोंद नाही, शेतील पाणी मिळत नाही, शेतील रस्ते मिळत नाहीत,प्लॉटचे सातबारा नाहीत,मुलांना नोक-याही नाहीत हे सांगत असताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले. तर श्रीमती हिराबाई गायकवाड म्हणाल्या मला मिळालेली जमीन आता रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. आम्हाला मिळालेली जमीन ही अगोदरच रेल्वे प्रशासनाने संपादित केलेली होती तरी शासनाने माझी फसवणुक केली आहे.
स्वाभिमाने  संघटनेचे कामगार नेते अनिल घराळ म्हणाले आपल्या गावचे पुर्नवसनाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील आपले प्रश्‍न जोपर्यंत निकाली निघत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.कराड तालुक्यातील विस्थापित असणा-या पाचही गावांनी मोठा लढा उभारला तर आपणाला न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रत्येक गावात बैठका घेणार आहे.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे म्हणाले खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमांतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करून शेतक-यांचे विविध प्रश्‍न सोडवून न्याय दिला आहे. त्याचप्रमाणे पुर्नवसित लोकही शेतकरीच ओत त्यांनी समाजातील  इतर शेतक-यांसाठी खुप मोठा त्याग करून देखील त्यांच्या समस्या गेली 40 वर्षे सुटलेल्या नाहीत त्यामुळे पहिल्यांदा निवेदन देवून प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करू तरीही समस्या सुटल्या नाहीत तर  प्रशासनाला जाग आणण्यासाठी स्वाभिमानी स्टाईलने धडा शिकवू.
यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे,युग आघाडीचे रोहीत पाटील,शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष शिवाजी चव्हाण,केंजळचे दिपक केंजळे,वसंत केंजळे,पिंपरीचे राजाराम वांगडे,वाघेश्‍वरचे सरपंच सुरेश क्षिरसागर,ग्रामपंचायत सदस्य आनंदा शिंदे,शंकर चव्हाण,बाबुराव चौधरी,परशुराम जाधव,सिताराम जाधव,बळीराम डिंगणकर,मधुकर कदम,पांडुरंग लोहार,दिलीप जाधव, युवराज जाधव,सुरेश माने,बाळू शिंदे यासह ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.उपस्थितांचे स्वागत करून आभार प्रशांत जाधव यांनी मानले.