कविता ह्या मनुष्यमनाचे अंतरंग उलघडण्याचे काम करतात : डॉ.ओक

वाई:   सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याचीजीवनशैली तणावयुक्त झाली आहे.याचा कुटुंब व वैयक्तिक जीवनावर विपरीत परिणाम होत असताना दिसत आहे.यातून मुक्ती मिळावयाची झाल्यास माणसाने कवितांचा आधार घ्यावा तरच तणावमुक्त जीवन होण्यास मदत होईल.कारण कविता ह्या मनुष्यमनाचे अंतरंग उलघडण्याचे काम करतात, असे प्रतिपादन मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते व नाट्यकलाकार डॉ. गिरीश ओक यांनी वाई वसंत व्याख्यान मालेत आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यान मालेत डॉ.गिरीश ओक हे कविता आमची-तुमची या विषयावर बोलत होते. यावेळी सौ. पल्लवी ओक, पार्श्वगायीका- सौ. स्नेहा मराठे यांनी डॉ. गिरीश ओक यांना कविता वाचनात सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- लक्ष्मीकांत राजने हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष- डॉ. शरद अभ्यंगकर, उपाध्यक्ष- प्रा. सदाशिव फडणवीस, कार्यवाह- वसंतराव बोपर्डीकर, सहकार्यवाह- अनिल जोशी, विश्वस्त- सुनील शिंदे, अ‍ॅड. शांतीलाल ओसवाल, डॉ. शंतनू अभ्यंगकर, प्रा.आनंदराव लोळे, डॉ. रुपाली अभ्यंगकर, विशाल कानडे, मदनकुमार साळवेकर, जेष्ठ पत्रकार- दत्तात्रय मर्ढेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कवितांचे सादरीकरण करीत असताना कवितांचे असणारे अनेक पैलू डॉ. ओक यांनी वाईकरांसमोर उलघडून दाखवीत असताना, कवितांचे मनुष्याच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. कवितांमध्ये प्रभात गीते, अंगाई गीत, लावणी, पोवाडा, भक्तिगीते, अभंग,शायरी, भारुड, यांचा समावेश असतो.डॉ. ओक म्हणाले, शांत ठिकाणी शब्दांच्या माध्यमातून भावनेचा होणारा उद्रेक म्हणजे कविता. कविता हा प्रकार अतिशय जिव्हाळ्याचा असून तो शांतपणे हाताळल्यास माणसाचे मन वाचण्याचे मोलाचे काम कविता करतात. कवी कुसुमाग्रज, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, वि.दा.करंदीकर, ग.दी.मांडगुळकर, या लेखकांच्या कविता अजरामर झाल्या आहेत. प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असत या पाडगांवकरांच्या कविते कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार झाली. तर त्याने प्रेम केले, तिने प्रेम केले त्यात तुमचे काय गेले या कवितेने वाईकरांना खिळवून ठेवले, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या कवितेने अरुण दाते, यांच्या आठवणीना उजाळा दिला, कै.अरुण दाते यांच्या विषयी डॉ, गिरीश ओक यांनी त्यांच्या स्वभाव गुनधर्माबद्दल भरभरून विवेचन केले. कवी कुसुमाग्रज यांच्या महावृक्ष, पृथ्वीने सूर्यावर प्रेम केले, वास्तुशास्त्र या कविता सौ.पल्लवी ओक यांनी सादर करून डॉ. ओक यांना मोलाची साथ दिली. ग. दी. मांड्गुळकर यांच्या सुधीर फडके यांनी गायिलेले गीत रामायण वर डॉ. ओक यांनी प्रकाश टाकताच वाईकरांनी टाळ्यांच्या गजर करीत प्रतिसाद दिला. पार्श्व गायिका स्नेह मराठे यांनी मस्त्य गंधा या नाटकातील तू तर चाफेकळी ही लावणी सादर केली. तसेच सौ.पल्लवी ओक यांनी हिंदी कविता सादर करून मुलगी- वडिलांना मला कशा पद्धतीचा वर शोधून आणावा  या  समाजातील अनेक घडामोडींवर नात्यातील संबंधावर प्रकाश टाकण्याच्या प्रयत्नाला वाईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच डॉ. गिरीश ओक यांनी सादर केलेल्या प्रेमावरील चारोळ्या व बालगीतांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. स्नेह मराठे यांनी कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व समारोप भैरवी गावून अतिशय गोड आवाजात केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. एकंदरीत डॉ. गिरीश ओक यांनी आपल्या टीम समवेत काही स्वतः तयार केलेल्या व काही अतिशय नावाजलेल्या लेखकांच्या कविता सादर करून वाईकरांसाठी एक पर्वणीच उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष- लक्ष्मीकांत राजने यांनीही त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वतः तयार केलेल्या कविता सादर करून वाईतील नवकवी कुठेही कमी नाही हे दाखवून देत कार्यक्रमाचा समारोप कवितेनेच केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह- वसंतराव बोपर्डीकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. शंतनू अभ्यंगकर यांनी करून दिला. डॉ. शरद अभ्यंगकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास वाईतील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.