जि.प. सर्वसाधारण सभेत अधिकारी धारेवर

सातारा ः आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकर लागू होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिप. सदस्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्हा कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे त्यांच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले तर खटावचे गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांची राज्य सरकारकडे रवानगी करावी, असा ठराव करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात मंगळवारी सर्वसाधारण सभा झाली. सभेपूर्वी शिक्षण सभापती सतीश चव्हाण यांनी जिपचे शाखा अभियंता विनायक रासकर व कराडचे जवान विनोद गायकवाड यांचा दुखवट्याचा ठराव मांडून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
स्वच्छता अभियानमध्ये जिल्हा परिषदेने केेलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशासन व पदाधिकारांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर कामकाजास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीच्या रिक्त सदस्यपदी समृध्दी जाधव यांची निवड करण्यात आली. मानसिंग माळवदे व सौ. फडतरे यांनी खटावचे गट विकास अधिकारी तानाजी लोखंडे पंचायत समिती पदाधिकारी व कर्मचार्‍यांशी उध्दटपणे वागतात. पदाधिकार्‍यां जुमानत नाहीत. मनमानी कारभार करतात, अशा अधिकार्‍याची बदली करावी, अशी मागणी केली. त्यावर नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, सातारा जिल्हा यशवंत विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा अधिकार्‍यांमुळे जिल्ह्याचे नाव खराब होते. त्यामुळे त्यांना पुन्हा राज्य शासनाकडे रवानगी करावी, असा ठराव मांडला. त्यास सर्वांनी मंजूरी देत अनुमोदन दिले. तर राजू भोसले म्हणाले, जिल्हा कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे हे कोणत्याही सभेस उपस्थित नसतात. त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरु असतो. ते कोणालाही न जुमानत एकाधिकारी शाही करत आहेत.
जलयुक्त शिवार योजनेत गावांची निवड करत असताना सातारा जावली व महाबळेश्‍वर तालुक्यांवर त्यांनी अन्याय केला. संदीप शिंदे यांनी जितेंद्र शिंदे यांच्या कारभाराचे वाभाडे काढत जिल्हा कृषी अधिकार्‍यांना जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहण्याचे माहित नाही. कृषी विभागाच्या समस्या मांडण्यास त्यांच्या कार्यालयात गेल्यास ते दाद देत नाही. त्यांच्या विभागामार्फत एका होतकरु तरुणाने 18 लाख रुपयांचे बंधार्‍याचे काम केले. त्या बंधार्‍याचे कृषी अधिकारी व त्यांच्या कर्मचार्‍यांनी परस्पर बिल काढून त्या तरुणांना ठेंगा दाखवला. त्यामुळे त्या तरुणांवर आत्महत्येची वेळ आली आहे. अशा अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यास शिक्षण सभापती सतिश चव्हाण यांनी री ओढली.
विषय पत्रिकेवरील निंबोडी, ता. खंडाळा, बनपेठवाडी, ता. पाटण, शिरढोण, ता. कोरेगाव अभेपूरी, ता. वाई, नुने, ता. पाटण व विजनगर, ता. कराड या पाच ठिकाणी नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूरी देण्यात आली. त्यावर खंडाळाचे सभापती नितीन भरगुडे-पाटील बोलताना म्हणाले, नवीन उपकेंद्रांना मान्यता देत असताना जिल्ह्यातील 60 आरोग्य केंद्रांवर डॉक्टर उपब्लध नाहीत. बहुसंख्य ठिकाणी डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. शेजारील आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांवर त्याचा अतिरिक्त कारभार स्विकारावा लागतो. त्यामुळे नवीन उपकेंद्रांना मंजूर देत असताना प्रथम डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांची पदे भरा, तसा राज्य सरकारला प्रस्ताव पाठवा, असे सांगितले. त्यावर शशिकांत पवार यांनी महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. त्यात मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाई तालुक्यातील आरोग्य केंद्रात मलग नसल्याने श्‍वविच्छेदन करण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यांची नेमणूक करावी, अशी मागणी केली. सतिश धुमाळ यांनी कोरेगाव तालुक्यातील बहुसंख्य जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत. त्यामध्ये रणदुल्लाबाद, मोरबेंद, चवणेश्‍वर या गावांमधील विद्यार्थ्यांनी तर गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षक पाहिले नाही. त्यामुळे शिक्षकांची नेमणूक करावी, असे सांगितल्यानंतर शिक्षण सभापती सतीश चव्हाण यांनी  विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळाची यादी तयार करण्यात आली आहे.  लवकरच अतिरिक्त शिक्षक असलेल्या शाळेतील शिक्षकांची बदली करुन शिक्षक नसलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली जाईल, असे सांगितले. विद्या थोरावडे यांनी कराड तालुक्यातील शेवाळेवस्ती येथील प्राथमिक शाळेतील महिला शिक्षकेस ग्रामस्थांकडून त्रास दिला जात आहे.
याबाबत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्या महिला शिक्षकेची इतर ठिकाणी बदली करावी, अशी मागणी केली. बाळासाहेब भिलारे यांनी लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सर्वसाधारण सभेत ठऱाव करण्याचे असलेले अधिकार स्थायी समितीला तात्पूर्त्या स्वरुपात द्यावेत. तसेच जिल्हा परिषदेच्या अंशदान निधीतून शिल्लक राहिलेले 26 कोटी रुपये ग्रामपंचायतींना थेट वाटप करावे, अशी मागणी केली. अनिल देसाई यांनी बोअरवेल दुरुस्तीचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कायम करावे, असा पुरवणी ठराव करण्याची मागणी केली.