शेतकर्‍यांना दुसराही हप्ता शंभर टक्के देणार: धैर्यशील कदम

औंध: वर्धन अँग्रो साखर कारखान्याने सव्वीसशे रुपये पहिली उचल देऊन दराबाबत दिलेला शब्द खरा करून दाखविला असून शेतकर्‍यांना दुसराही हप्ता शंभर टक्के देणार असल्याची ग्वाही वर्धन अँग्रोचे संस्थापक चेअरमन धैर्यशील कदम यांनी दिली.
वर्धन अँग्रोच्या गाळप हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक हिंदुराव चव्हाण, संपत माने, भिमराव पाटील, सागर शिवदास, सुदाम दिक्षीत, चंद्रकांत मदने, भिमराव डांगे, पृथ्वीराज निकम, विक्रमशील कदम, सत्वशील कदम, यशवंत चव्हाण, अविनाश साळुंखे, दत्तात्रय साळुंखे, सतीश सोलापूरे,दिपक लिमकर,सहदेव माने,प्रविण भोसले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कदम पुढे म्हणाले एक लाख पंचवीस हजार मेट्रीक टनाचे गाळप केले आहे. पुढील वर्षी अडीच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यंदा परदेशातून मागणी असलेल्या दहा हजार टन जागरी पावडरीचे विक्रमी उत्पादन कारखान्याने केले आहे. साडे चार हजार मेट्रीक टन साखर उत्पादन, अडीच हजार टन मोलँसिसचे,सात हजार टन बगँस उत्पादन घेण्यात आले आहे.
पुढील वर्षी डिस्टिलरीचे काम हाती घेणार आहोत तसेच यावर्षी 11.70टक्के साखरेचा उतारा आला आहे पुढील वर्षी 12.70टक्के पर्यंत उतारा नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कारखान्यातील कामगार, शेतकरी ऊस उत्पादकांनी एक कुटुंब म्हणून याकारखान्याकडे पहावे . कारखान्यातील सर्व विभागातील अधिकारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपणासह संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.
यावेळी कारखान्यास सर्वाधिक ऊस पुरवठा करणार्‍या शेतकरी, वाहतूकदार,कंत्राटदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक विक्रमशील कदम यांनी केले. सूत्रसंचालन रणजित चव्हाण, अनिल यादव,आभार सत्वशील कदम यांनी मानले.