थंडीच्या बचावासाठी नागरिकांचा उबदार कपडे खरेदीकडे कल

कराड : गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल घडून थंडी जाणवू लागली आहे. थंडी पासून संरक्षण व्हावे म्हणून नागरिकांची पावले उबदार कपडे खरेदीकडे वळू लागली आहेत. शहराच्या विविध भागात उबदार कपडे विक्रीत्यांनी आपली दुकाने सज्ज केली आहेत. स्वेटर्स मफलर्स, कानटोपी, कानपट्टया, सॉक्स, हातमोजे यांच्या किंमतीत यावेळी वाढ झाली आहे.
दिपावलीपासूनच वातावरणात बदल घडून थंडीची चाहूल लागते. मात्र यावेळी पावसाळी वातावरण राहिल्याने वातावरण जैसे.थे होते. मात्र गेल्या आठवडयापासून वातावरणात बदल घडून थंडी जाणवू लागली आहे. बाजारपेठीतील व्यापार्‍यांनी दिवाळी दरम्यानच उबदार कपडयांची खरेदी केली होती. मात्र गेले महिना झाला तरी व्यापार्‍यांच्या मालाला ग्राहक नव्हता. थंडी जाणवू लागताच आठवडाभरापासून बाजारपेठेत उबदार कपडे खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
रस्त्यावरील उबदार कापडे विके्रत्यांनी कोल्हापूर (गांंधीनगर) येथील माल खरेदीस प्राधान्य दिले आहे. तर व्यापार पेठेतील दुकानदारांनी कंपन्यांचा माल उपलब्ध केला आहे. ग्राहक आपआपल्या कुवतीनुसार बाजारपेठेत उबदार कापडे खरेदी करताना दिसत आहेत. रस्त्यावरील विक्रेते 250 रुपयांपासून 400 रुपयापर्यंत स्वेटरसची विक्री करत आहेत. तर दुकानातील स्वेटरची किंमत 500 रुपयांपासून 1000 रुपयांच्या आसपास आहेे. रस्त्यावरील कानटोपीची किंमत 80 ते 100 रुपयापर्यत आहे तर दुकानातील कानटोपीची किंमत 100 ते 150 पर्यत आहे. तसेच इतर मफलर्स, सॉक्स, हातमोजे, यांचे दर कमी अधिक प्रमाणात आहेत.
थंडीच्या महिन्यात मॉर्निंग वॉक करणार्‍यांची संख्या वाढली आहे. येथील प्रीती संगम, पी.डी.पाटील उद्यानात नियमित पाई व्यायाम करणारे आहेत. त्यात थंडीमुळे फिरणारांची संख्या वाढली आहे. शहरातील उपहार गृहामध्ये चहा, नाष्टा करणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.