ओंड येथे चर्चासत्र व पथनाटयाद्वारे मतदार जागृती

कराड: ओंड, ता.कराड येथे ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने मतदार जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रमातर्गंत मतदार जागृती विशेष अभियान पथकाच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाटयाद्वारे मतदानाचे महत्व सांगत मतदान करण्याचे आवाहन केले.
सातारा लोकसभा मतदार संघासाठी दि.23 रोजी होणार्‍या मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढीबरोबर मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ओंड,ता.कराड येथील ग्रामपंचायत सभागृहात ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, स्वीप कार्यक्रमातर्गंत मतदार जागृती विशेष अभियान पथकाचे एल.यु.कुटे, सहाय्यक पथक प्रमुख सुनील परिट, दत्तात्रय पाटील, ज्ञानदीप संस्थेचे प्रदीप थोरात, अमोल कांबळे, एस.एन.डी.टी.विद्यापीठ मुंबईच्या समाजसेवा पदवीच्या विद्यार्थ्यांनी स्नेहल जाधव, काजल शिंदे यांची उपस्थिती होती.
सुनील परिट म्हणाले, लोकसभेची निवडणूक हा एक राष्ट्रीय उत्सव आहे. तो लोकशाही प्रधान देशामधील सुजान नागरिकांनी, मतदारांनी आपले अनमोल मतदान या लोकसभेच्या निवडणूकीसाठी देवून मतदानाचा टक्का वाढवावा व लोकशाहीचा सन्मान करावा.
यावेळी ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, स्नेहल जाधव व काजल शिंदे यांनी मतदार जागृतीपर मार्गदर्शन केले. अर्चना पाटील यांनी प्रास्ताविक केले. किशोर थोरात यांनी आभार मानले. दरम्यान, ओंड येथील बाजारपेठेत कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील 16 विद्यार्थ्यांनी पथनाटयाद्वारे मतदारांसाठी असणार्‍या सुविधा, मतदानाची महत्व सांगत कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश दिला.