पुणे वनविभागाची तज्ज्ञ टीम लवकरच 150 हून अधिक मोकाट जनावरांना करणार जेरबंद!

ओंड-ओंडोशी भागातील त्रस्त शेतकर्‍यांना दिलासा; ना.डॉ.अतुल भोसले यांचा पुढाकार

कराड: ओंड-ओंडोशी परिसर आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट जनावारांमुळे त्रस्त झाले आहेत. 150 हून अधिक मोकाट जनावरे उभ्या पिकांची नासधूस करत असल्याने, या भागातील शेतकर्‍यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
शेतकर्‍यांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. ना. डॉ. भोसले यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या कार्यालयाशी चर्चा करून, ही मोकाट जनावरे या भागातून स्थलांतरीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली.
त्यानुसार आता पुणे वनविभागातील तज्ज्ञांच्या टीमला या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कराड येथे लवकरच पाचारण करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांमुळे त्रस्त झालेल्या ओंड-ओंडोशीसह आपसापासच्या गावातील लोकांनी हा प्रश्न निकालात निघावा, यासाठी ना. डॉ. अतुल भोसले यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार आज ओंडोशी (ता. कराड) येेथे डॉ. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड वनविभागाचे अधिकारी ए. एम. साजणे आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आपले गार्हाणे मांडताना शेतकर्‍यांनी मोकाट जनावरांमुळे होत असलेल्या त्रासाचा पाढाच वाचला. 10-15 वर्षांपूर्वी 5-6 असणार्‍या जनावरांची संख्या आता जवळपास दीडशेच्यावर पोहचली आहे. यामध्ये गायी व बैलांचा समावेश असून, गवारेड्यासदृश्य प्रकृतीमुळे एकटा माणूस त्यांचा सामना करू शकत नाही. ही जनावरे रात्रीच्या वेळी ओंड, ओंडोशी, थोरातमळा, नांदगाव, विंग, तुळसण, पाचपुतेवाडी, घारेवाडी, शिंदेवाडी यासासह आसपासच्या गावातील शेतात घुसून पिकांची मोठी नासधूस करतात.
त्यांना हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या आवाजात वाद्ये वाजविणे, फटाके फोडणे, आगीचे गोळे घेऊन भिती दाखविणे असे नानाविध प्रकार करून पाहिले. इतकेच नव्हे तर पिकांच्या रक्षणासाठी अनेकांनी कित्येक रात्री रानातच मुक्काम केला. पण या सगळ्या उपायांमुळे या जनावरांवर यत्किंचितही परिणाम झालेला नाही, असे म्हणणे मांडून ग्रामस्थांनी या सर्व जनावरांना जेरबंद करून अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे अशी आग्रही मागणी केली.
शेतकर्‍यांचे म्हणणे विचारात घेतल्यानंतर ना. डॉ. अतुल भोसले यांनी तत्काळ राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या कार्यालयाशी संपर्क करून, याप्रकरणी वनविभागाने लक्ष घालावे अशी विनंती केली. डॉ. भोसले यांच्या विनंतीची दखल घेत संबंधितांनी, ओंड-ओंडाशी परिसरातील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी पुणे वनविभागाच्या तज्ज्ञ टीमकडे सोपवित असल्याचे सांगितले. ही टीम पर्यावरणीय नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून, तसेच जनावरांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत काम करेल, असा विश्वास डॉ. भोेसले यांनी ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केला.
कराडचे वनक्षेत्रपाल श्री. साजणे यांनीही या भागातील मोकाट जनावरांचा त्रास केवळ शेतकर्‍यांनाच होत नाही, तर शासनाने सुरू केलेल्या वृक्षलागवड मोहिमेलाही त्याचा फटका बसत असल्याचे सांगितले.
त्यामुळे या मोकाट जनावरांना स्थलांतरित करण्यावाचून पर्याय नाही. या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला ओंडोशीचे सरपंच सुनील मोरे, उपसरपंच बाळासाहेब चोरमारे, व्ही. टी. थोरात, सर्जेराव थोरात, राजेंद्र थोरात, इंद्रजीत हणभर, प्रवीण थोरात, भरत थोरात, संकेत शिंदे, अभिजीत कोठावळे, प्रल्हाद थोरात यांच्यासह ओंड, ओंडोशी, थोरातमळा, नांदगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.