शासनाचा निषेध करत निगडीत ग्रामस्थ व युवकांनी रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने मुजवले

मसूर: निगडी मसुर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला याचे गांभीर्य लक्षात घेऊन निगडीतील ग्रामस्थ व युवक एकत्र येऊन शासनाचा निषेध करत या रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने मुजवले.
याबाबत अधिक माहिती अशी की, निगडी मसूर या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले असून याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या खड्ड्यांनी निगडी व घोलपवाडी येथील दोन युवकांची रस्त्यातील खड्डे चुकवताना मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जणांना जीव गमवावा लागला तर अनेक जण या रस्त्यावरून प्रवास करताना खड्ड्यांमुळे जखमी झाले आहेत तर अनेकांना मणक्याचे विकार झाले आहेत.
अनेक वेळा मागणी करूनही ही प्रशासन लक्ष देत नसल्याने शेवटी निगडी येथील जवळपास शेकडो युवक व ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने मुजवले तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या वेली काढून रस्ता स्वच्छ केला.
संबंधित विभागाने रस्त्याची त्वरित पाहणी करावी व रस्ता दुरुस्त करावा अन्यथा प्रशासनाने जन आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा सज्जड इशारा निगडी व घोलपवाडी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.