जिद्द असेल तर यश निश्चित मिळते: प्रांताधिकारी मुल्ला

मेढा: प्रत्येकाने जिद्द, चिकाटी व योग्य दिशेने प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळेल. त्यासाठी आपल्या अंगी सकारत्मकत हवी. जी जी आवडीची क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रात विद्यार्थानी झोकून घ्यावे. तुमच्यातूनच उद्याचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकिल, इंजिनीअर, आदर्श नागरिक, प्राध्यापक, शिक्षक, घडणार आहेत. त्यासाठी आतापासूनच योग्य दिशा ठरवून त्याप्रमाणे मार्गक्रम केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती जावली, शिक्षण विभाग व श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने 45 वे जावली तालुका विज्ञान प्रदर्शन वेण्णा विद्यालयात आजपासून सुरु झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांचे हस्ते, जावली पंचायत समितीच्या माजी सभापती अरूणा शिर्के, गट शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोरडमल, केंद्रप्रमुख अलका संकपाळ, वेण्णामाईचे अध्यक्ष सुरेश पार्टे, मेढा नगरसेवक विकास देशपांडे, सचिन करंजेकर, सचिन जवळ व प्राचार्य श्रीनिवास सणगर आदी मान्यवरांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण म्हणाले, जावली तालुका हा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये जिल्ह्यात आघाडीवर आहे. शिष्यवृत्ती पॅटर्न व इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये जावली नेहमीच आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनातील शाळांच्या सहभागाबद्धल नाराजी व्यक्त करून जास्तीत जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच दि.10 ते दि.12 अखेर चालणार्‍या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ जास्त विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी घ्यावा, असे ही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. प्रारंभी उपस्थीत मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रांताधिकारी श्री. मुल्ला यांनी विद्यार्थानी अत्यंत कल्पक बुद्धीने तयार केलेल्या उपक्रमाची पाहाणी करुन त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमास तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पाटील सर तर आभार प्राचार्य श्री.सणगर सर यांनी मानले.