सुभेदार आण्णासाहेब माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

म्हसवड: टेरीटोरियल आर्मी महाराष्ट्र. लाईट इंफंट्री 109 मधील सुभेदार आण्णासाहेब माने यांच्यावर लष्करी इतमामात वरकुटे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


सुभेदार माने यांचे शनिवारी रात्री पुणे येथे निधन झाले होते.टेरीटोरियल आर्मी महाराष्ट्र च्या दक्षिण कमांडचे अधिकारी सुभेदार मेजर संजिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या त्यांच्या सहकार्‍यांनी बंदुकीच्या तीन फरी झाडून सुभेदार माने यांना अखेरची मानवंदना दिली.
शासनाच्या वतीने माण तालुक्याच्या तहसीलदार बी.एस्. माने यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.त्यानंतर टेरीटोरियल आर्मी महाराष्ट्र. लाईट इंफंट्री 109. च्या दक्षिण कमांडचे अधिकारी पाटील व म्हसवड पोलिस स्टेशनवर स पो नी यांनी पुष्पचक्र अर्पण करुण मानवंदना दिली.


पार्थिवावरील तिरंगा सुभेदार माने यांच्या पत्नीच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर सुभेदार माने यांच्या मुलांनी अग्निसंस्कार केले.
यावेळी अमर रहे अमर रहे आण्णासाहेब माने अमर रहे! वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या.
तत्पूर्वी पार्थिव दुपारी तीन वाजता वरकुटे येथे आणल्यानंतर गाव व परिसरातील हजारो नागरिकांनी सुभेदार माने यांचे अंत्यदर्शन घेतले.
यावेळी त्यांची आई पत्नी व मुलांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांच्या डोळ्याला पाणी आले. नंतर सजवलेल्या ट्रॅक्टर मधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावात जागोजागी पार्थिवाचे फुलांचा वर्षाव करण्यात आला.
अंत्यविधीसाठी अनेक राजकीय सामाजिक शासकीय शक्षणिक कृषी उद्योग क्षेत्रात काम करणारे हजारो नागरिक उपस्थित होते.