क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या वतीने पूरग्रस्तांना आर्थिक मदत

म्हसवड: सामाजिक बांधिलकी म्हणून व महापुरामध्ये सापडलेल्या पूरग्रस्तांना व संकटग्रस्तांना म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या वतीने खारीचा वाटा म्हणून रोख रक्कम दहा हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी व माणुसकीचा आधार म्हणून क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा, आत्मगिरी माध्यमिक विद्यालय, क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कुल, क्रांतिवीर ज्यू कॉलेज, नूतन मराठी प्राथमिक शाळा या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून फुल नाही तर फुलांची पाकळी म्हणून आर्थिक मदत केली. विद्यार्थ्यांच्या खाऊच्या पैश्यातून एकूण दहा हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात आले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुल नेहमी संकटग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे करणार असे आश्वासन संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी दिले.